विविध क्षेत्रांतील ‘नवस्वयंसिद्धां’चा सन्मान
सावंतवाडी :
माजगाव येथे भारत कला संगम ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘उर्मी’ गरबा नाईटला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना ‘नवस्वयंसिद्धा’ पुरस्काराने सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले व युवराज लखमराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमा दरम्यान पत्रकार व न्यूज ॲंकर जुईली पांगम, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ रिया सावंत, ब्युटीशियन व अकॅडमी संचालिका शीतल सावंत, यशस्वी उद्योजिका तुलजा प्रशांत कोचरेकर, युगा फॅशन हाऊसच्या संस्थापक युगा पोकळे, मेहंदी आर्टिस्ट प्राची सावंत, फोटोग्राफर व आर्ट डायरेक्टर तन्वी चव्हाण आणि अभिनेत्री व कंटेंट क्रिएटर रुचिता शिर्के यांचा गौरव करण्यात आला. यासोबतच वकीली व ॲंकरिंग क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या ॲड. प्रणिता भक्तराज राऊळ, नृत्य आणि मॉडेलिंग क्षेत्रातील पूजा सावंत-राणे, तसेच ‘चला जाऊ’ इंस्टाग्राम पेजवर ‘कोकणातली नवदुर्गा’ मालिका चालवणारे कंटेंट क्रिएटर सुयोग खांडाळेकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी उर्मी आणि भारत कला संगम ट्रस्टच्या उपक्रमांचे कौतुक केले. गुणवत्तेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आयोजकांचा उद्देश स्तुत्य असल्याचे सांगत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ट्रस्टच्या अध्यक्षा स्तुती गुरव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, हा शासनमान्यता प्राप्त ट्रस्ट कला, संस्कृती, शिक्षण, क्रीडा, शेती व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून शाळा, महाविद्यालये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नवोदित प्रतिभावंतांना संधी देण्याचे कार्य करत आहे.
उद्घाटन आणि गौरव सोहळ्यानंतर उपस्थितांनी गरबा नाईटचा मनमुराद आनंद लुटला. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनीही गरब्याचा फेर धरत आनंद द्विगुणित केला. या सोहळ्यात साक्षी सावंत हिची देवीच्या रूपातील एन्ट्री विशेष आकर्षण ठरली. तसेच कार्यक्रमादरम्यान आयोजित रील कॉम्पिटिशनला सोशल मीडिया प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन कोकण अँकर ॲड. प्रणिता कोटकर-राऊळ यांनी केले.
या सोहळ्याच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी प्रदीप्ती कोटकर, प्रतीक्षा तांडेल, अवधूत राणे, ॲड. तेजस परब आणि कुणाल विवेक खोत यांनी सांभाळली. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टच्या अध्यक्षा स्तुती गुरव, उपाध्यक्ष रसिका नाईक, सचिव संकेत कुवेस्कर, सहसचिव चंद्रकांत बोरभाटकर, खजिनदार साईश्वर गुरव, विश्वस्त किशोर सरनोबत, गोपाळ कोरगावकर, ॲड. कौस्तुभ गावडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.













