मोती तलावात बुडणाऱ्या तरुणाला दिले जीवदान
सावंतवाडी : येथील मोती तलावाच्या पाण्यात तोल जाऊन पडलेल्या एका परप्रांतीय मजूराला आर.पी.डी. कॉलेजच्या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान आणि धाडस दाखवत सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.
ही घटना बुधवारच्या सुमारास घडली. संबंधित तरुण दारूच्या नशेत मोती तलावाच्या काठावर झोपला होता. स्थानिकांनी त्याला तिथून हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेत असल्याने तोल जाऊन तो थेट तलात पडला. यावेळी कॉलेजचे विद्यार्थी क्रिश सावंत, सर्वेश सावंत, दीक्षांत सावंत, सर्वेश धुरी, गजानन बांदेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत प्राण वाचवले. कठड्याच्या बाजूला असलेली एक वायर त्या बुडणाऱ्या तरुणाच्या दिशेने टाकली. तरुणाला ती वायर घट्ट पकडण्यास सांगून या विद्यार्थ्यांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे











