एक गंभीर ; बाहेरचावाडा येथील घटना
मारहाण पाहिल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने वृद्ध महिलेचा मृत्यू
सावंतवाडी : येथील बाहेरचावाडा परिसरात घरगुती वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या मारामारीच्या घटनेत टिकावने डोक्यावर वार केल्याने समीर नझीर बेग हे गंभीर जखमी झाले, तर या झटापटीत त्यांचा लहान भाऊ इम्रान नझीर बेग हादेखील किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन्ही भावांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल
करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, ही मारहाणीची घटना पाहिल्यानंतर आपल्या घरी परतलेली त्यांची एक नातेवाईक वृद्ध महिला चक्कर येऊन खाली पडली. तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर नझीर बेग हे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वडिलांचा फोन आल्याने त्यांना भेटण्यासाठी बाहेरचावाडा येथील आपल्या जुन्या घरी गेले होते. तेथे ते खुर्चीवर बसून वडिलांशी बोलत असताना, जुन्या घरगुती वादाचा राग मनात धरून त्यांचा सख्खा लहान भाऊ इम्रान नझीर बेग याने घराबाहेरून टिकाव आणला आणि समीर यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने समीर यांना तातडीने उपचारांसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवून घेतला असून, मारामारी करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संशयित इम्रान नझीर बेग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दुसरीकडे, इम्रान नझीर बेग यानेही सावंतवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. या झटापटीत आपणास मारहाण करण्यात आल्याने आपल्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे इम्रान याने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांकडून दुसऱ्या बाजूनेही गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, बेग कुटुंबातील या दोन सख्ख्या भावांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून घरगुती वाद सुरू असून, यापूर्वीही त्यांच्यात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. हा कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दोन्ही भावांना आणि कुटुंबीयांना समोरासमोर बसवून अनेकदा समजूत घालण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतरही हा वाद शमला नाही आणि अखेरीस त्याचे पर्यवसन रक्तरंजित हाणामारीत झाले. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत.
*मारहाण पाहिल्यानंतर नातेवाईक महिलेचा मृत्यू*
बाहेरचावाडा येथे बेग बंधूंमध्ये झालेली मारहाण पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ती मारहाण पाहिल्यानंतर ती महिला आपल्या घरी परतली. तिथे चक्कर येऊन ती खाली पडली. त्यानंतर तिला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत सावंतवाडी पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












