क्यूआर कोडच्या माध्यमातून मोबाईलवर ऐकता येणार किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचा अभिनव उपक्रम
पर्यटकांच्या उपस्थितीत सेवेचा शुभारंभ; पर्यटनाला मिळणार नवी चालना
अमित खोत | मालवण : जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांवर आता पर्यटकांसाठी डिजिटल ऑडिओ गाईड सुविधा उपलब्ध झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई मंडळाच्या वतीने जागतिक वारसा सप्ताहानिमित्त हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून, पर्यटकांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधणारा हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वारसा पर्यटनाला नवी चालना देणारा ठरणार आहे.
या सुविधेसाठी किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. पर्यटकांना आपल्या मोबाईलद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास, स्थापत्यवैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक महत्त्व यांची माहिती ऐकता येणार आहे. विशेष म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच किल्ल्यावरील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती आणि ठिकाणे समजून घेण्यासाठी डिजिटल नकाशाची सुविधाही देण्यात आली आहे.
या डिजिटल सुविधेमुळे देशी-विदेशी पर्यटकांना किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती अधिक सहज आणि सुलभपणे जाणून घेता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मितीचा गौरवशाली वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या सेवेच्या शुभारंभप्रसंगी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे उपअधीक्षक डॉ. ए. व्ही. नागानूर, सर्व्हेअर निलेश सोनवणे, राजेश चंदनशिवे, गणेश ढोबळे, विवेक कुमार, वैभव बेटकर, चेतन सोलंकी आदींसह पर्यटक उपस्थित होते.
राज्यातील अन्य काही ऐतिहासिक ठिकाणी ही ‘डिजिटल ऑडिओ गाईड’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) हाती घेतला आहे. अशीही माहिती यावेळी देण्यात आली.













