जाणू विज्ञान, अनुभव विज्ञान’ उपक्रमातून राजापूरच्या बालवैज्ञानिकांची गगनभरारी

नासाचा अभ्यास दौरा यशस्वी करून विश्वनाथ विद्यालय नं. १ चे शिवसमर्थ मुंढे व ओवी पवार मायदेशी परतले
 राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण ‘जाणू विज्ञान, अनुभव विज्ञान’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत निवड झालेल्या राजापूर तालुक्यातील दोन गुणी विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाच्या ‘नासा’ (NASA) या अंतराळ संशोधन संस्थेचा अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. विश्वनाथ विद्यालय राजापूर नं. १ या शाळेचे विद्यार्थी कु. शिवसमर्थ प्रशांत मुंढे व कु. ओवी संदिप पवार हे हा दौरा पूर्ण करून मायदेशी परतले असून, त्यांच्या या यशाने विश्वनाथ विद्यालय राजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांना जागतिक स्तरावरील संशोधन जवळून पाहता यावे, या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा परिषदेने ‘जाणू विज्ञान, अनुभव विज्ञान’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या अत्यंत खडतर चाळणी परीक्षा व निवड प्रक्रियेतून आपली गुणवत्ता सिद्ध करत शिवसमर्थ आणि ओवी यांनी या दौऱ्यासाठी आपले स्थान निश्चित केले होते.
दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा अभ्यास दौरा पार पडला. या पंधरा दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी नासा येथे प्रत्यक्ष भेटी देऊन रॉकेट प्रक्षेपण तंत्रज्ञान, उपग्रहांची कार्यप्रणाली आणि आधुनिक अंतराळ संशोधनाचे धडे गिरवले. जागतिक स्तरावरील वैज्ञानिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची सुवर्णसंधी त्यांना या निमित्ताने लाभली. याचबरोबर त्यांनी अमेरिकेतील विविध ठिकाणी भेटी दिल्या. स्वतःच्या जिद्द व प्रयत्नांनी या मुलांनी जागतिक महासत्तेला भेट देण्याचे स्वप्न साकार केले.
त्यांचा हा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार जाऊन मिळवलेल्या या यशाबद्दल विश्वनाथ विद्यालय राजापूर नं. १ चे  मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग तसेच शिक्षण विभाग व राजापूरवासियांकडून दोन्ही विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत व अभिनंदन केले जात आहे.