सावंतवाडी युवासेना अध्यक्ष रियाज खान यांचे तहसीलदारांना निवेदन
बांदा : प्रतिनिधी
फळ पीक विमा योजनेतील दहा गुंठे क्षेत्राची अट व ई-केवायसीसाठी लागू करण्यात आलेली थम प्रक्रियेची अट शिथिल करावी, या मागणीसाठी सावंतवाडी तालुका युवासेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक रचना, जमिनीचे तुकडे व सामाईक क्षेत्रामुळे अनेक शेतकऱ्यांकडे एकाच सर्व्हे नंबरमध्ये दहा गुंठे क्षेत्र उपलब्ध होत नाही. मात्र विविध सर्व्हे नंबरमधील क्षेत्र एकत्रित केल्यास ते दहा गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक भरते. त्यामुळे वेगवेगळ्या सर्व्हे नंबर मधील क्षेत्र एकत्रित ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच १५ तारखेपासून ई-केवायसीसाठी थम देण्याची अट लागू केल्याने वयोवृद्ध व शारीरिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर जाणे कठीण होत आहे. त्यामुळे थम प्रक्रियेची अट शिथिल करून पर्यायी सुविधा द्यावी आणि आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेची माहिती ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून द्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
जाचक अटींमुळे जिल्ह्यातील शेतकरी फळ पीक विमा संरक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रशासनाने शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी युवासेना सावंतवाडी तालुका अध्यक्ष रियाज खान यांनी केली आहे.













