दादासाहेब सरफरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

संगमेश्वर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी शिवने येथे आपत्ती व्यवस्थापन विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी घ्यावयाची काळजी, करावयाच्या उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत स्वतःसह इतरांचे संरक्षण कसे करावे, याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये अपघातांची कारणे, अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीने द्यावयाची मदत, जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे उचलण्याच्या विविध पद्धती तसेच उपलब्ध साहित्याचा वापर करून स्ट्रेचर तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच आग लागल्यास घ्यावयाची खबरदारी, आगीच्या परिस्थितीत करावयाची कृती आणि फायर एक्स्टिंग्विशरचा योग्य वापर कसा करावा, याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. सर्पदंश झाल्यास कोणती प्राथमिक काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याविषयीही विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. आपत्ती कोणत्याही स्वरूपाची असो, अशा प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखून योग्य ती मदत करणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या प्रशिक्षणातून करून देण्यात आली.
आपत्ती व्यवस्थापन विभागप्रमुख प्राध्यापक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षिका कु. युगंधरा म्हामुणकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली. प्राचार्य प्रकाश विरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रात्यक्षिकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले.