मसुरे | झुंजार पेडणेकर ‘: मानव साधन विकास संस्थे’च्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या फिरत्या पॅथॉलॉजी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कांदळगाव येथे रक्त तपासणी उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात ६० ग्रामस्थांची रक्त तपासणी करण्यात आली.
माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेशजी प्रभु संस्थापक अध्यक्ष असलेल्या ‘मानव साधन विकास संस्थे’च्या माध्यमातून आणि विद्यमान अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांतून संगणकीय यंत्रणेने सुसज्ज अशी ही मोबाईल पॅथॉलॉजी व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे. आजारांचे वेळेत निदान होऊन आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने ४० वर्षांवरील महिला व पुरुषांसाठी या तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.
रामेश्वर मंदिराजवळील ‘स्नेहांगन’ येथे सकाळी ९ ते ११.३० या वेळेत रक्ताचे नमुने घेण्यात आले. डॉ. श्री. संजय सावंत यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली ‘सीबीएस’ (हिमोग्लोबिन, तांबड्या व पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स), ‘ब्लड ग्लुकोज’ (मधुमेह तपासणी), ‘लिपिड प्रोफाइल’ (कोलेस्ट्रॉल व चरबीचे ६ घटक) आणि ‘सीरम क्रिएटिनिन’ (किडनी तपासणी) या चाचण्या करण्यात आल्या.
ही मोबाईल व्हॅन दर दोन महिन्यांनी (वर्षातून ५ ते ६ वेळा) कांदळगावात नियमित कार्यरत राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या प्रसंगी सरपंच रणजीत परब, उपसरपंच राजेंद्र कदम, ग्रामपंचायत सदस्य सौ. शारदा मुळ्ये, दत्तविहार कोदे, उमेश कोदे, विलास हडकर, अर्चना कोदे, संजय परब, राजेंद्र हरी कदम, सुधाकर राणे, राकेश कदम यांच्यासह टेक्निशियन प्रगती नाईक, सिद्धि परब आणि सहाय्यक ओंकार शेलार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष आचरेकर यांनी केले.













