मुणगेत आढळला उभयचर ‘सिसिलीयन’

▪️रूपेश तेली व दादा वळंजू यांच्या जागरूकतेचे कौतुक 

 ▪️पारदर्शक अंड्यांसह दुर्मिळ सजीव सुरक्षित

 मसुरे | झुंजार पेडणेकर : देवगड तालुक्यातील मुणगे सावंतवाडी येथे रूपेश तेली यांना आपल्या घराजवळील माडबागेत साफसफाई करत असताना पारदर्शक व गजऱ्याच्या आकाराची अंडी दिसून आली. अंड्यासोबत सापांसारखा एक जीव दिसून आला. तेली यांनी निसर्गप्रेमी दादा वळंजू यांना याबाबत माहिती दिली. दरम्यान याबाबत अधिक माहितीसाठी वनविभागाशी संपर्क साधला असता सदर अंडी आणि सजीव प्राणी हा देवगांडूळ असल्याचे सांगण्यात आले.

सिसिलीयन (देव गांडूळ ) हा उभयचर प्राणी आहे. दिसायला तो गांडुळासारखा लांबट असून त्याला पाय नसतात. त्यामुळे काही ठिकाणी त्याला “देवगांडूळ” असेही म्हटले जाते. लांब, नळीसारखे शरीर असते. त्वचेवर वलयांसारख्या घड्या असतात. तो साप किंवा गांडूळ नसून उभयचर आहे. प्रामुख्याने ओलसर मातीमध्ये, जमिनीखाली किंवा पाण्याजवळ आढळतो अशी माहिती कणकवली वनक्षेत्रपाल सुहास पाटील यानी दिली. गांडुळे, कीटकांच्या अळ्या आणि इतर लहान जीव खातो.डोळे अतिशय लहान असतात आणि काही प्रजातींमध्ये ते त्वचेखाली जवळजवळ लपलेले असतात.डोक्याजवळ टेन्टकल नावाचा संवेदनशील अवयव असतो, ज्याच्या मदतीने तो आजूबाजूचे वातावरण जाणून घेतो. भारतात, विशेषतः पश्चिम घाट परिसरात हे आढळतात असेही श्री पाटील म्हणाले. परिमंडळ वनअधिकारी श्रीकृष्ण परिट यानी सुद्धा माहितीसाठी सहकार्य केले.

माजी मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार यानी माहिती देताना सांगितले की, यातील काही प्रजाती स्वताचे संरक्षण करण्यासाठी त्वचेतून विषा सारखा स्त्राव काढतात.यापूर्वी संशोधक डॉ. वरद गिरी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली येथे देव गांडूळ प्रजातीच्या अनेक जातीचा शोध लावलेला आहे. रूपेश तेली व दादा वळंजू यांनी या दुर्मिळ सजीवाबद्दल उत्सुकता दाखवत त्याच ठिकाणी त्याचे संवर्धन केल्या बद्दल अभिनंदन होत आहे.