देवगड प्रतिनिधी
घरगुती वादातून नाद धनगरवाडी येथील रामचंद्र बाबाजी शिंदे (50) यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाला मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी तेथील संजय धोंडू शिंदे (29) व संजय विठ्ठल वरक (27, रा. गवाणे धनगरवाडी ) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र शिंदे हे 22 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुलगा आशिष रामचंद्र शिंदे याच्या समवेत घराच्या बाहेर तुळशीच्या लग्नाची तयारी करीत होते. यावेळी तेथे आलेला संशयित संजय शिंदे याने घरगुती वादातून रामचंद्र शिंदे यांच्या हातापायावर चीव्याच्या दांड्याने मारून दुखापत केली. तर संशयित संजय वरक याने रामचंद्र शिंदे यांचा मुलगा आशिष याच्या डाव्या पायावर चीव्याच्या दांड्याने मारून दुखापत केली. यावेळी रामचंद्र शिंदे यांची पत्नी रंजना ही तेथे आली असता त्यांनाही संशयित संजय शिंदे याने चिव्याच्या दांड्याने मारून त्यांच्या डोक्याला दुखापत केली. तसेच दोन्ही संशयितांनी आशिष याला तुझा एक पाय मोडला, दुसरा पाय मोडेन अशी धमकी दिली. याबाबत रामचंद्र शिंदे यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संजय शिंदे व संजय वरक या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत करीत आहेत.













