ज्ञानदीप महाविद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना मूलभूत हक्क आणि कर्तव्यांची जाणीव

खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य, मोरवंडे-बोरज येथे २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेची जाणीव करून देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कु. सानिका काणेकर आणि कु. आदिबा परकार यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून दाखविली. संविधानातील मूल्ये, लोकशाही व्यवस्था आणि नागरिकांच्या अधिकारांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमात प्रा. गौरी ठसाळे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत हक्क, तसेच देशाचा जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावयाची कर्तव्ये याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने संविधानाचे नियमित वाचन करून त्यातील मूल्ये आत्मसात करावीत आणि आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. आरती गुहागरकर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा, संस्थेचे सर्व सभासद तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उमेशकुमार बागल यांनी विशेष कौतुक केले. संविधानातील लोकशाही मूल्ये आणि नागरिकांच्या कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.