मच्छीमार, पारंपारिक रहिवाशी यांच्या ठामपणे पाठीशी : आमदार निलेश राणे

हरित न्यायाधिकरणाचा निर्णय किनारपट्टीवासीयांसाठी ऐतिहासिक व सकारात्मक

किनारपट्टीवरील बांधकामांसंदर्भात थेट कारवाईचे कोणतेही आदेश नाहीत

किनारपट्टीवरील एकाही व्यक्तीवर यापुढेही अन्याय होऊ देणार नाही

पर्यावरणाचा समतोल राखण्यासही आमचे सर्वोच्च प्राधान्य : आ. निलेश राणे

मालवण | प्रतिनिधी : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मालवणच्या किनारपट्टीवरील बांधकामांसंदर्भातील पिटीशन डिसमिस करत दिलेला निर्णय स्थानिक मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक आणि पारंपरिक रहिवाशांच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक व ऐतिहासिक आहे. किनारपट्टीवासीयांच्या हितरक्षणासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून, मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. किनारपट्टीवरील एकाही व्यक्तीवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. स्थानिकांच्या हक्कांचे आणि उपजीविकेचे संरक्षण करतानाच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील, अशी ठाम भूमिका आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केली.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे खंडपिठाने दिलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी निलरत्न निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार राणे बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, नगरसेवक रविकिरण तोरसकर, जॉन नन्होना, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

तेव्हाचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले त्यांना विषयच समजला नाही

आमदार निलेश राणे म्हणाले, याचिकाकर्ते यांनी २०१९ पासून 2025 पर्यंत किनारपट्टीच्या सर्वेक्षणाबाबत व आक्षेप घेतला तक्रारी केल्या केल्या. २०१९ पासून हे सर्व सुरु होते. मार्च २०२४ मध्ये मालवण नगरपरिषद, मेरीटाईम बोर्ड, भूमी अभिलेख, तलाठी, एमसीझेडएमए यांसह प्रशासनाच्या ८ ते १० विभागांकडून सर्वेक्षण करून लवादासमोर सादरीकरण करण्यात आले. या सर्वे बाबत त्यावेळच्या लोकप्रतिनिधींचे लक्ष असते तर त्याचवेळी हा प्रश्न निकाली निघाला असता. तेव्हाचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले त्यांना विषयच समजला नाही. मात्र आम्हाला राजकारण करायचं नाही. जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत.

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचे सहकार्य व सकारात्मक भूमिका महत्त्वपूर्ण

किनारपट्टीवर पारंपरिक पद्धतीने राहणारे नागरिक व मच्छीमार बांधवांना, व्यवसाईकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे पाठीशी आहोत. पारंपरिक व्यवसाय किंवा निवासाच्या बाबतीत कोणतीही गडबड झाल्यास तीव्र उद्रेक होईल आणि आम्ही मच्छीमार समाजाच्या पाठीशी स्थानिक व खंबीरपणे उभे राहू. पर्यावरणाचे रक्षण राखत किनारपट्टीवरील घटकांना संरक्षण देणे हाच मुख्य उद्देश आहे. या सर्व प्रक्रियेत पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी यांचे सहकार्य व सकारात्मक भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. यासोबत तहसीलदार, नगरपरिषद आणि विकी तोरसकर, जॉन नरोना यांच्यासह स्थानिक व सर्व सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मला कोणत्याही श्रेयवादात जायचे नाही; तर किनारपट्टीचा हा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सुटणे महत्त्वाचे आहे. असे आमदार निलेश राणे म्हणाले.

पुणे खंडपीठाच्या आदेशाबाबत बोलताना ते म्हणाले की, या आदेशात प्रशासन, स्थानिक किंवा कोणतीही संस्था जबाबदार असल्याचे नमूद नाही. उलट याचिकाकर्त्याची याचिका फेटाळण्यात आली. अतिशय महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा हा निकाल आहे. पुढील सहा महिन्यांत प्रशासनाने सर्वेक्षण करून तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही बांधकामावर थेट कारवाईचा कोणताही आदेश नाही. किनारपट्टीवर राहणाऱ्या अगर व्यवसाय करणाऱ्या कोणालाही अडचण होईल असा कोणताही आदेश यामध्ये समाविष्ट नाही, असेही आमदार श्री. राणे म्हणाले. होणाऱ्या सर्वे मध्ये कोणावरही अन्याय होणार नाही. पर्यावरणाचा समतोल राखणे यालाच प्राधान्य राहणार आहे. याचिकाकर्ते श्री हुले हे पर्यावरणवादी आहेत. त्यांनाही मी सांगतो पर्यावरणाला कुठे ही हानी होणार नाही यालाच सर्वोच्च प्राधान्य राहील. असेही आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

किनारपट्टीवरील मच्छीमार, पारंपरिक रहिवाशी यांच्या ठामपणे पाठीशी

किनारपट्टीवरील प्रत्येक व्यक्तीच्या आम्ही सोबत आहोत. प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमार, पारंपरिक रहिवाशी यांच्या ठामपणे पाठीशी राहून आवश्यक ती सर्व मदत या सर्व प्रक्रियेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही आमदार निलेश राणे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.