खेड (प्रतिनिधी) : मजुरीचे पैसे न देता बळजबरीने चिरेखाणीवर काम करून घेणे, विरोध केल्यास मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार खेड तालुक्यातील घाणेखुंट आणि दाभोळ परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी राम धनसिंग राठोड आणि भरत धनसिंग राठोड या दोन मुकादमांविरोधात लोटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश कल्लू बनवासी (वय २३, मूळ उत्तर प्रदेश) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संशयितांनी मजुरीचे पैसे न देता बळजबरीने काम करून घेतल्याचा आरोप आहे. मजुरी मागितल्यावर मारहाण, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह वेठबिगार पद्धती (निर्मूलन) कायद्याच्या कलम १६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेने कामगारांच्या सुटकेसाठी पुढाकार घेतला. जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर खेड प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा विधी सेवा समितीने पत्रकार तथा पीएलव्ही मनोज पवार यांची या प्रकरणात नियुक्ती केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार कदम करीत आहेत.












