अधिकाऱ्यांनी नागरिकांना विनाकारण त्रास देऊ नये, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांच्या स्पष्ट सूचना
खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील सुकीवली जिल्हा परिषद गटाची पहिली आढावा बैठक शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सुकीवली-गोपाळवाडी येथील राधाकृष्ण मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या गावातील विविध समस्या, प्रलंबित विकासकामे तसेच शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न मांडले.
नामदार योगेश कदम यांच्या आदेशानुसार आयोजित या बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सचिन धाडवे यांनी कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत थेट संवाद साधला. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत त्यांनी संयमी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा केली. विविध समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रामाणिक प्रयत्न केले जातील, अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयीन स्तरावर विनाकारण त्रास सहन करावा लागू नये, कोणत्याही अधिकाऱ्याने नागरिकांना वेठीस धरू नये आणि अनावश्यक विलंब करू नये, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश सचिन धाडवे यांनी प्रशासनाला दिले. जनतेच्या प्रश्नांवर जबाबदारीने उत्तरे देऊन सकारात्मक पद्धतीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीला उपाध्यक्ष तथा तिसंगी पंचायत समिती गणाचे सदस्य महेंद्र भोसले, पंचायत समिती विस्तार अधिकारी नाथाभाऊ पाटील, सुकीवली पंचायत समिती सदस्या सुनीता कासार, महिला तालुकाध्यक्ष मुग्धा भोसले, युवा सेना तालुकाप्रमुख मिलिंद काते, तालुका सहसचिव श्रीराम कदम, विभागप्रमुख श्रीकांत शिर्के, महिपत घोलप यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
सुकीवली जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या समस्या व विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पुढील बैठक मार्च महिन्यात आंबवली येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सचिन धाडवे यांनी यावेळी दिली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत नियमित आढावा बैठकींच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.













