‘पशुसंवर्धक गोठा’ प्रकल्पाला प्रथम क्रमांक
विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेचे परीक्षकांकडून कौतुक
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडेच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक पटकावत प्रशालेच्या शैक्षणिक यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शेतकरी आणि पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या ‘पशुसंवर्धक गोठा’ या नावीन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पाने परीक्षकांची विशेष दाद मिळवली.
शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जनावरांची सुरक्षितता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. याच समस्येचा वेध घेत विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाची संकल्पना विकसित केली. गोठ्याला अचानक आग लागल्यास विशिष्ट सेन्सर आणि सिग्नल यंत्रणेच्या साहाय्याने बांधलेली जनावरे आपोआप दाव्यातून मुक्त होतील आणि त्यांना सुरक्षितपणे गोठ्याबाहेर पडण्यास मदत होईल, अशी या प्रकल्पाची संकल्पना आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित न ठेवता तो थेट ग्रामीण जीवनातील समस्यांच्या निराकरणासाठी कसा करता येतो, याचे प्रभावी उदाहरण या प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी सादर केले.
या प्रकल्पात कु. गार्गी सचिन कांबळी, कु. भार्गवी विठोबा पेडणेकर आणि विपुल मनोहर पेडणेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विज्ञान शिक्षिका सौ. मिलन प्रतापराव देसाई यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. प्रकल्पाच्या प्रतिकृती निर्मितीसाठी माजी विद्यार्थी अथर्व संतोष पंडित यांनी विशेष सहकार्य केले. तसेच पर्यवेक्षक दयानंद बांगर, प्रयोगशाळा सहाय्यक नंदकिशोर बुगडे आणि परिचर सिताराम कोळेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला शिक्षकांच्या मार्गदर्शनाची आणि सहकाऱ्यांच्या योगदानाची जोड मिळाल्याने हे यश साकार झाले. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन होत आहे.
तालुकास्तरावर मिळविलेल्या या यशामुळे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी प्रशालेच्या संघाचा आत्मविश्वास निश्चितच उंचावला असून, पुढील स्तरावरही हे विद्यार्थी उल्लेखनीय यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








