जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष संतोष राऊळ यांची प्रमुख उपस्थिती
कलंबिस्त । प्रतिनिधी :
तालुक्यातील कलंबिस्त येथील कलंबिस्त इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२६ मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शुक्रवार, दिनांक ३ जुलै रोजी सकाळी ठीक ११ वाजता प्रशालेच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोष राऊळ लाभणार आहेत. तसेच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सावंत आणि सचिव बाबा राऊळ यांच्यासह इतरही स्थानिक मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
माध्यमिक शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात विशेष सत्कार केला जाणार आहे. तरी या कौतुक सोहळ्याला आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले आहे.













