तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिवडाव माध्यमिक विद्यालयाची यशस्वी भरारी

गणेश वर्पे शिक्षक प्रतिकृती गटात प्रथम

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

विद्यार्थ्यांचाही विविध स्पर्धांमध्ये सहभाग

कणकवली : जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व पंचायत समिती, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव येथील सरस्वती विद्यालयात २६ व २७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिवडाव माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. या प्रदर्शनात शिक्षक प्रतिकृती गट (माध्यमिक विभाग) या प्रकारात शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे गणित-विज्ञान शिक्षक श्री. गणेश अशोक वर्पे यांनी प्रथम क्रमांक पटकावत प्रशालेच्या यशात मानाचा तुरा रोवला. त्यांच्या या यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. कणकवली पंचायत समितीच्या सभापती सौ. हर्षदा वाळके यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

या विज्ञान प्रदर्शनात शिवडाव माध्यमिक विद्यालयाने विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश पवार यांच्या नियोजनानुसार तसेच विज्ञान शिक्षक श्री. गणेश वर्पे आणि गणित शिक्षिका सौ. नुझहत पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपले कौशल्य सादर केले. विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेत ओंकार काशिनाथ गावकर (इयत्ता दहावी) आणि स्वरा चंद्रकांत शिरसाट (इयत्ता सातवी) यांनी सहभाग घेतला. निबंध स्पर्धेत लहान गटातून दिव्या जयंत गावकर, तर मोठ्या गटातून नेहल मारुती शिवडावकर यांनी सहभाग नोंदवला. वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून धनश्री गजानन शिरवडेकर हिने सहभाग घेतला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत लहान गटातून अंश तेली आणि तन्मयी कोरगावकर, तर मोठ्या गटातून अनिरुद्ध केली आणि आदित्य कोरगावकर यांनी सहभाग नोंदवला. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध संकल्पना समजून घेण्याची, आपल्या कल्पकतेला वाव देण्याची तसेच प्रत्यक्ष कृतीतून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली. मुख्याध्यापकांच्या नियोजनामुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात आत्मविश्वासाने सहभागी होता आले.

प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सौ. हर्षदा वाळके, गटशिक्षणाधिकारी श्री. गवस, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. मांजरेकर, नांदगाव प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुधीर तांबे तसेच तालुक्यातील विज्ञानप्रेमी शिक्षकवर्ग उपस्थित होता. मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी शिक्षक व सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्या या यशाबद्दल शिवडाव सेवा संघाचे अध्यक्ष श्री. मोहन पाताडे, कार्यवाह श्री. काशीराम गावकर, शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यरेखा दळवी, शालेय समितीचे पदाधिकारी आणि प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी प्रथम क्रमांक मिळवणारे शिक्षक श्री. गणेश अशोक वर्पे तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेल्या श्री. वर्पे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.