डॉ. रमाकांत गावडे यांना इंडोनेशियात दुसऱ्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 

सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

 

बांदा । प्रतिनिधी : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोगटे-वाळके महाविद्यालय, बांदा येथील डॉ. रमाकांत गावडे यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार दुसऱ्यांदा प्रदान करण्यात आला. २० नोव्हेंबर रोजी इंडोनेशिया येथे आयोजित विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

 

डॉ. रमाकांत गावडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. सामाजिक जनजागृती, शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

 

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विचारातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या कार्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

 

सांस्कृतिक क्षेत्रातही डॉ. गावडे यांनी भारतीय संस्कृती, सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कार्यातून समाजात परिवर्तनवादी दृष्टिकोन निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.