कलंबिस्त येथील गड-किल्ले स्पर्धेत जयेश पास्ते प्रथम

 

 

कलंबिस्त । प्रतिनिधी : ज्ञानमंदिर वाचनालय व कला क्रीडा मंडळ, कलंबिस्त आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कलंबिस्त पंचक्रोशी मर्यादित गड-किल्ले बनवण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत जयेश प्रकाश पास्ते याने प्रथम क्रमांक पटकावला, तर काव्या रवींद्र तावडे हिने द्वितीय आणि वेले शाळा क्रमांक एकने तृतीय क्रमांक मिळवला. आर्यन देसाई व वेले शाळा क्रमांक दोन यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त पंचक्रोशीतील मुलांना इतिहासाची ओळख व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या परिसराला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभला असून शिवापूर येथील मनमोहक संतोषगड त्याची साक्ष देत आहे. मावळ्यांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या या सह्याद्रीच्या पट्ट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा अभ्यास मुलांना व्हावा, आजच्या पिढीला तो समजावा आणि इतिहास जागा राहावा या हेतूने दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे परीक्षण सिद्धेश सावंत, बाळा राजगे व बाळकृष्ण कदम यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सचिव रूपा सावंत, खजिनदार रमेश सावंत, संचालक मंडळ तसेच शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे रोहन सावंत, तेजस देसाई, स्वप्निल सावंत, विराज सावंत, विकी सावंत, सुभाष देसाई, शेखर मेस्त्री आदींचे विशेष सहकार्य लाभले. याशिवाय पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत व रवी कमल सावंत यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लवकरच संपन्न होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दोन्ही मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उत्तम सहकार्य केले.

छायाचित्र ओळ : कलंबिस्त येथे आयोजित गड-किल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेला जयेश पास्ते व द्वितीय क्रमांक पटकावलेली काव्या तावडे यांनी साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती.