आईला डॉक्टर बनवायचं होतं… नियतीने हजारो मुलांच्या स्वप्नांना दिशा देणारा माणूस घडवला!

आईच्या अपूर्ण स्वप्नाला सामाजिक कार्यातून दिले पूर्णत्व

सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांना मानद डॉक्टरेट

सावंतवाडी । प्रतिनिधी :
एका आईची इच्छा होती, आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे… गरिबीमुळे उपचारांसाठी हतबल होण्याची वेळ येऊ नये, त्यानेच आपल्याला आजारातून बरे करावे. मात्र, परिस्थितीने त्या स्वप्नाला वेगळीच दिशा दिली. स्वतः डॉक्टर होता आले नाही, पण हजारो मुलांच्या स्वप्नांना दिशा देण्याचे भाग्य लाभले. एका आईच्या डोळ्यांत पाहिलेले स्वप्न आज अनेक मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा आधार बनले आहे. ही भावस्पर्शी कहाणी आहे, गेली १५ वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दयानंद सुलोचना श्रीराम कुबल यांची.

कोकण एनजीओ इंडिया या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या दयानंद कुबल यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल २८ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात युनायटेड अमेरिकन युनिव्हर्सिटीतर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे. एका आईच्या अपूर्ण स्वप्नातून सुरू झालेल्या त्यांच्या सामाजिक वाटचालीचा हा सन्मान आहे.

दयानंद कुबल पाचवीत शिकत असताना त्यांच्या आईला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारांमध्ये अडचणी येऊ नयेत, मुलाने डॉक्टर व्हावे आणि आपल्याला बरे करावे, अशी त्यांच्या आईची मनापासून इच्छा होती. त्या प्रेमाने मुलाला म्हणायच्या, “दया, तू डॉक्टर हो. म्हणजे मला आजारपणात आपण गरीब आहोत, याची झळ बसणार नाही. माझा मुलगाच मला बरं करेल!”

आईच्या या शब्दांत केवळ मुलाने डॉक्टर होण्याचे स्वप्न नव्हते, तर गरिबीमुळे उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ कोणावरही येऊ नये, ही एका आईची आर्त भावना होती. आईचे हे स्वप्न दयानंद यांच्या मनात खोलवर रुजले. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना वैद्यकीय शिक्षण घेता आले नाही. आईच्या स्वप्नाची पूर्तता करता आली नाही, याची खंत मनात असतानाच त्यांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली.

स्वतः डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले, तरी समाजातील गरजू मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले. कोकण एनजीओ इंडियाच्या माध्यमातून गेली १५ वर्षे ते विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना मदत, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न, अशा कार्यातून त्यांनी अनेक मुलांच्या भविष्याला नवी आशा दिली आहे.

आईच्या एका स्वप्नाने त्यांच्या आयुष्याला दिशा दिली; आज त्याच दिशेने अनेक मुलांच्या आयुष्याला नवे वळण मिळत आहे. स्वतःला डॉक्टर होता आले नाही, मात्र हजारो मुलांच्या स्वप्नांना दिशा देणारा माणूस घडता आला, हीच त्यांच्या सामाजिक कार्यामागील खरी प्रेरणा आहे.

आईला आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे, असे वाटत होते. वैद्यकीय शिक्षणातून मिळणारी एमबीबीएस पदवी आणि सामाजिक योगदानाबद्दल मिळणारी मानद डॉक्टरेट या स्वरूपाने वेगळ्या आहेत. मात्र, मानद डॉक्टरेटच्या या सन्मानामुळे आईने आपल्या मुलाला डॉक्टर झालेलं पाहण्याचं जपलेलं स्वप्न एका वेगळ्या अर्थाने पूर्णत्वास गेल्याची भावना दयानंद कुबल यांच्या मनात आहे. आईच्या पश्चात मिळालेला हा सन्मान त्यांच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.

एका आईच्या डोळ्यांतले स्वप्न… हजारो मुलांच्या डोळ्यांत नवी आशा! दयानंद कुबल यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या यशाची कहाणी नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे आयुष्य बदलण्याची प्रेरणा देणारा प्रवास आहे. स्वतःच्या अपूर्ण स्वप्नाला समाजाच्या उज्ज्वल भविष्याशी जोडणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

युनायटेड अमेरिकन युनिव्हर्सिटीतर्फे मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित होणाऱ्या दयानंद सुलोचना श्रीराम कुबल यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.