मुंबई-गोवा महामार्गाचे काम विहीत मानकाच्या आधारे तातडीने पूर्ण करा

अग्रीमा संघाची जोरदार मागणी

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ च्या रखडलेल्या तसेच निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या महामार्गा संबंधित गंभीर समस्या निदर्शनास आणून देण्यासाठी अग्रीमा महिला संघ रत्नागिरीच्या प्रतिनिधींनी नितीन गडकरी यांची दि. ०६ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे भेट घेतली व प्रश्नांची मांडणी केली. महामार्ग अधिकच रखडत चालल्याने प्रवाशांना, परिसरातील व्यावसायिकांना होत असलेला त्रास तसेच निकृष्ट बांधकामामळे कायमचा असुरक्षित झालेला महामार्ग ही गंभीर चिंतेची बाब असून त्यावर सत्वर कृती करावी आणि या महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण केले जावे अशी मागणी करण्यात आली.
निवेदनाद्वारे त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे- पर्शुराम घाटासारख्या भागांसाठी महामार्गावरील सर्व टेकड्या आणि उतार स्थिरीकरण कामांची गुणवत्ता ज्यामध्ये रॉक बोल्टींग, वायर मेशिंग आणि संबंधित कामांचा समावेश आहे अशा कामांचे सखोल मूल्यांकन करून भूभागाची संरचनात्मक अखंडता आणि दिर्घकालीन सुरक्षितता सुनिश्चित करावी, राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाट (खेड तालुका) येथे तीव्र उतार आणि तीव्र वळणे आहेत. यामुळे जड वाहने अनेकदा नियंत्रण गमावतात. त्यामुळे जीवघेणे अपघात होतात त्याचबरोबर मालाचे नुकसान देखील होते. या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या सक्षम वेग नियंत्रण प्रणालीची तातडीने व्यवस्था करावी. पर्शुराम घाटावर, महामार्गावर शाळेच्या बसेस शाळेकडे वळतात त्या जंक्शनवर एक वाहतूक चौक प्रस्तावीत आहे. या मार्गावर मोठ्या कंटेनर व ट्रकसह जड वाहनांची संख्या जास्त असते. पर्शुराम घाटाच्या नैसर्गिक चढ-उतारामुळे वाहने वेगाने खाली येतात, ज्यामुळे या भागात अपघातांचा धोका लक्षणियरीत्या वाढतो. विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे हे लक्षात घेऊन या महामार्गावर एक उड्डाणपूल बांधण्यात यावा किंवा पर्यायी सुरक्षा उपाययोजना लागू करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर एकूण १७८ बांधकामे उभारण्यात आली आहेत. ज्यामध्ये ४९ मोठे पूल, ७१ लहान पूल, ४५ अंडरपास, १२ उड्डाणपूल आणि १ बोगदा यांचा समावेश आहे. या कामांची तसेच या महामार्गाशी संबंधीत इतर कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी तात्काळ एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी. वृक्षारोपण उपक्रमात कमालीची अनास्था असून वृक्ष लागवड व देखभाल प्रक्रियेत मोबदला देऊन संबंधित गावातील महिला बचत गटांना जोडून घेण्यात यावे, महामार्गाच्या बांधकामाची परिस्थिती व गांभिर्य पहाता केंद्र सरकारने या महामार्गाच्या देखरेखीची जबाबदारी पुन्हा स्विकारावी. या गंभीर समस्यांची सत्यता दर्शवणारी कागदपत्रे, फोटो व चित्रफिती इत्यादी पुरावे स्विकारण्यास मंत्री महोदयांनी नकार दिला. मात्र या महामार्गाचे तांत्रिक सल्लागार श्री. टेंग-नागपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी पीडब्ल्यूडी श्री. शेलार यांचेकडे आपण पाठपुराव्याच्या कामी संपर्क साधावा असा त्यांनी सल्ला दिला व कृतीचे आश्वासन दिले. या चर्चेमध्ये अग्रीमा संघाच्या निमंत्रक शामल कदम, अध्यक्षा स्वाती साळवी, कार्याध्यक्षा मुस्कान अडरेकर व सचिव मानसी भोसले यांनी सहभाग घेतला