निलेश राणे यांचा विजय २५ हजार मताधिक्याने निश्चित !
उसने अवसान आणणाऱ्या ठाकरे गटाने अस्तित्वाची चिंता करावी ; माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा हल्लाबोल
मालवण | प्रतिनिधी : भाजपा पक्ष म्हणजे अथांग सागर आहे. पक्षात पक्ष प्रवेश करणाऱ्यांची संख्या दरदिवशी वाढत आहे. मात्र, याच्या उलट स्थिती ठाकरे गटाची झाली आहे. ठाकरे गटात अपरिपकव नेतृत्व व नेतृत्वावावर कोणाचाही न राहिलेला विश्वास यामुळे कार्यकर्त्यांसह आमदार, खासदारही वेगळी वाट धरत आहेत. मालवण कुडाळ तालुक्यात भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने उसने अवसान आणून केवळ वरिष्ठाना खूष करण्यासाठी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख टीका टिपण्णी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता जनताही ठाकरे गटाच्या खोट्या आश्वासनाला व भुलथापाला कंटाळली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मालवण कुडाळ मतदार संघातून निलेश राणे यांचा विजय २५ हजार पेक्षा जास्त मताधिक्याने निश्चित आहे. असा दृढ विश्वास मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला आहे.
मालवण शहर भाजपा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुदेश आचरेकर यांनी आपल्या आक्रमक शैलीत ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाजपा उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, माजी नगरसेविका पूजा सरकारे, विलास मुणगेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक आबा हडकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, राजू बिडये, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, संदीप पेडणेकर, प्रशांत परब, मंगेश यादव, संदीप मालंडकर, कमलेश कोचरेकर, सुधीर साळसकर, निनाद बादेकर, संजय कडू, ओंकार लुडबे आदी उपास्थित होते.
सुदेश आचरेकर म्हणाले, ठाकरे गटाने आपल्याकडे कोण कार्यकर्ते शिल्लक राहिलेत का ? याचे मोजमाप आधी करावे. उठसूट टिका टिप्पणी करता, अशोभनीय भाषा वापरता त्यावेळी तुमच्या सोबत नगरपरिषदेतील मागील शिलेदार का नसतात ? केवळ चार टकली सोबत घेऊन तुम्ही वापरत असलेली भाषा ही तुमच्या पक्षाचे संस्कार दाखवणारी व जनतेचा अपमान करणारी आहे. भाजपामध्ये होत असलेले पक्ष प्रवेश तुमच्या पचनी पडत नसल्याने अस्वस्थता वाढल्याने आपण वाफा सोडत आहात. आपले पक्ष नेतृत्व अपरिपक्व आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याच नादी लागून नाहक द्वेष करणे थांबवा हाताला काहीही लागणार नाही. असाही टोला सुदेश आचरेकर यांनी लगावला.
आमच्या नेत्यांवर टिका करण्याचे धाडस नको
भाजपा नेते दत्ता सामंत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज भरताना असलेली गर्दी ही आमच्या पक्षाची ताकद दर्शवणारी होती. ती गर्दी बघून तुमच्या आमदारांची झोप उडाली. त्रेधातिरपीट झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या रॅलीत त्यावेळचे तुमच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते होते. यावरून आपण आत्मपरीक्षण केलेले बरे. दत्ता सामंत यांच्यावर टिका करण्याचे धाडस आपण दाखवू नका. दत्ता सामंत आपल्या कृतीतून व घेत असेलेल्या पक्षाप्रवेशाच्या कृतीतून आपल्याला योग्य उत्तर मिळत असेल. असेही आचरेकर म्हणाले.
आमदार खोटी आश्वासने किती दिवस देणार ?
आमदार वैभव नाईक यांनी गेली दहा वर्षे जनतेला खोटी आश्वासने देण्याचे काम केले. तत्कालीन मंत्री आमचे नेते नारायण राणे यांच्या कार्यकाळात मालवण कुडाळ मध्ये जी विकासाचनी गती पकडली होती ती आमदार नाईक यांच्या काळात ठप्प झाली. मात्र आता केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठा विकासनिधी प्राप्त होत आहे. अनेक विकासकामानी पुन्हा गती पकडली आहे. निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळच्या गतिमान विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असलेली कामे मंजूर होत आहेत. त्यामुळे जनतेचा ओढा तसेचअन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपकडे ओढा वाढत आहे. पक्षा प्रवेश होत आहेत असे सुदेश आचरेकर यांनी सांगितले.
निलेश राणेंसारखे दातृत्व आपल्याकडे आहे का ?
कुडाळ मालवण भाजप विधानभसा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून जन हिताचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. सवलतीच्या दरात अनेक वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सर्व उपक्रमांना मिळत असलेला प्रतिसाद ठाकरे गटाला झोंबत आहे. मात्र, त्यांनी जळफळाट करण्यापेक्षा स्वतः उपक्रम राबवावे. सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचे प्रयत्न करावा. जनतेसाठी चांगले काहीतरी करण्यासाठी आतातरी प्रयत्न करावा असा टोलाही आचरेकर यांनी ठाकरे गटाला लगावला.
हिंमत असेल तर तुमच्या पक्षाची मालवणातील गळती थांबवा
भाजपा पक्ष संघटना व कुडाळ मालवण मधील निलेश राणे यांचे नेतृत्व यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहेत. आगामी काही महिन्यात १२ नव्हे तर २४ पक्ष प्रवेश मालवण तालुक्यात होतील. असे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी जाहीर केले आहे. हे पक्ष प्रवेश होणारच. हिंमत असेल तर ठाकरे गटाने आपल्या पक्षाला लागेलेली गळती थांबवावी अशी बोचरी टिका सुदेश आचरेकर यांनी केली आहे.
*निलेश राणे यांच्या विजय निश्चित*
भाजप पक्ष संघटना ही एकसंघपणे काम करणारी संघटना आहे. मालवण कुडाळ तालुक्यात आगामी सर्व निवडणुकीत १०० टक्के विजय व विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा २५ हजार मताधिक्याने विजय निश्चित आहे. प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बँक संचालक बाबा परब यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील आम्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निलेश राणे यांच्या विजयाचा निर्धार केला आहे. असे सुदेश आचरेकर यांनी स्पष्ट केले. विजय केनवडेकर यांनीही आमचे लक्ष शतप्रतिशत भाजप हेच लक्ष असून आम्ही ठाकरे गटाकडे लक्ष देत नाही, ठाकरे गटाची कृती उसकावणे अश्या स्वरूपातील असल्याचे स्पष्ट केले.
फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व भाजप पदाधिकारी. (अमित खोत, मालवण)












