संघटना वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन जोमाने काम करण्याची गरज … – प्रकाश झगडे
मोडकाआगर | वार्ताहर : गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ,गुहागर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी श्री संत तुकाराम महाराज सभागृह. शृंगारतळी येथे तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेची सुरुवात दीप प्रज्वलन, श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा पुजनकरून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. संघाचे सचिव प्रविण प्रकाश रहाटे यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. तसेच तेली समाजातील आजी माजी पदाधिकारी व तालुका कार्यकारिणी सदस्य, गट प्रमुख,गाव प्रमुख यांचा अध्यक्ष प्रकाश झगडे व कार्यकारीणी सदस्य यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या सभेत प्रत्येक गावातील महिला सभासदांचा सन्मान करण्यात आला.या सभेमध्ये झोंबडी तेलीवाडी येथील कु. अनिकेत मनोहर लांजेकर याची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तेली समाजातील सर्व महिलांच्या वतीने पाच महिलांनी अनिकेत लांजेकर याच्या हातात राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. त्यानंतर सचिव प्रविण प्रकाश रहाटे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले त्याला मंजुरी घेण्यात आली. मागील जमाखर्च वाचन करून पुढील खर्चाला मंजुरी घेतली. पुढील वर्षासाठी लेखापरिक्षकाची नेमणूक करण्यात आली. गुहागर ता. तेली समाज सेवा संघाच्या भावी वाटचालीवर अनेक समाजबांधवानी आपली मते मांडली. समाजबांधणी, हे मुळ उद्दीष्ट असून सभासद नोंदणी ही अत्यंत महत्वाची असल्याने त्यासाठी सर्व समाजबांधव भगिनीनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले.
इमारत बांधकामासाठी जास्तीत जास्त निधी संकलन करण्याचे आवाहन करण्यात आले. बांधकाम समिती समितीच्या माध्यमातून नवीन तेली समाज भवन इमारत बांधकामाची दिशा ठरविण्यात येणार आहे. सभासदांनी जास्तीत जास्त आजीवन सभासद करण्यासाठी प्रयत्न करावे असेही आवाहन करण्यात आले,तसेच सभासद नोंदणीसाठी सभासदांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली तिला मंजुरी घेण्यात आली. यासभेत गुहागर तालुका तेली समाज युवक प्रमुखपदी अडुर येथील दिनेश दिपक झगडे याची एकमताने निवड करण्यात आली तर महिला प्रमुखपदी दिव्या दिपक किर्वे यांना पुन्हा महिला प्रमुख पदाची संधी देण्यात आली. यावेळी बोलताना प्रशांत रहाटे यांनी गुहागर तालुक्यामध्ये तेली समाजाची पतसंस्था असावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रकाश झगडे यांनी सर्व समाज बांधवानी संघटनेला बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून संघटना वाढीसाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.संघटना वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन जोमाने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.या सभेला व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश झगडे,उपाध्यक्ष गजानन जाधव, सचिव प्रविण प्रकाश रहाटे, सहसचिव गणेश किर्वे, खजिनदार विश्वनाथ रहाटे, मदन जाधव, अनिल रहाटे, गोपाळ झगडे, माजी युवक प्रमुख प्रितम रहाटे, माजी सचिव विजय रहाटे, युवक प्रमुख दिनेश झगडे, महिला प्रमुख दिव्या किर्वे, अस्मिता झगडे,माजी अध्यक्ष एकनाथ रहाटे, शशिकांत पवार आदीसह सर्व सल्लागार, सदस्य व समाज बंधु भगिनी उपास्थित होते. शेवटी आभार सहसचिव गणेश किर्वे यांनी मानले. शेवटी स्नेहभोजनाने सभेची सांगता करण्यात आली.











