लांजा (प्रतिनिधी) सैनिकांचा गाव अशी ओळख असलेल्या तालुक्यातील सालपे ग्रामपंचायतीमार्फत गावातील स्वातंत्र्य सैनिक, देशसेवक आणि शहीद जवान, पोलीस दलातील सेवक यांच्या सन्मानार्थ आकर्षक असा वीरशीला फलक उभारण्यात आला असून नियोजनबद्ध पद्धतीने सुशोभित करण्यात आलेला हा फलक आकर्षणाचा भाग बनला आहे.
शासनाच्या मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत प्रत्येक गावातील देशसेवक आणि स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवान, पोलीस दलातील सेवक यांच्या सन्मानार्थ सरकारने वीरशीला फलकाची निर्मिती करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिलेल्या आहेत. त्यानुसार सालपे ग्रामपंचायतीने देखील हा शिलाफलक अत्यंत नियोजन पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने केला आहे. शिलापालकाच्या चारी बाजूंनी चौथर्याला टाईल्स लावून अत्यंत सुशोभित असा शिलाफलक तयार करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य संकेत घाग यांची ही संकल्पना आहे .यासाठी सरपंच पूजा कांबळे तसेच ग्रामसेवक कुंभारे यांच्या देखरेखीखाली चांगल्या प्रकारे फलक तयार करण्यात आला आहे.
सालपे गाव हा सैनिकांचा गाव अशी ओळख असून गावाने १०१ देशसेवक आजपर्यंत या देशाला दिलेले आहेत. सरकारी निधीचा चांगला वापर करून अतिशय उत्कृष्ट असे वीरशिलाफलक सालपे गावात तयार करण्यात आले आहे. तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे .सालपे ग्रामस्थांतून देखील या वीर फलकाचे कौतुक करण्यात येत आहे.












