लांजा (प्रतिनिधी)लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे ‘नॅक’कडून (राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद) मूल्यांकन करण्यात आले असून महाविद्यालयाने ३.१७ गुण प्राप्त करीत ‘ ए ‘ श्रेणी प्राप्त केली आहे
तिसऱ्या मानांकनात लांजा महाविद्यालयाला ३.०२ गुणांसह ‘ए’ श्रेणी प्राप्त केली होती. यावेळी ह्या गुणांमध्ये वाढ करून लांजा महाविद्यालयाने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे.
दि. ८ व ९ ऑगस्ट रोजी महाविद्यालयास नॅकच्या तज्ज्ञ समितीने भेट देऊन महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सहशैक्षणिक, संशोधन, सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय कामाची पाहणी केली. संस्था पदाधिकारी, प्राचार्य, विविध विभाग, आजी माजी विद्यार्थी, पालक यांच्याकडून महाविद्यालयाची माहिती जाणून घेतली होती. नॅकच्या या समितीमध्ये अमेठी विद्यापीठ, राजस्थानचे प्र – कुलगुरू प्रा. शंकर कोठारी, चेअरमन, छत्तीसगढ येथील इंदिरा कला संगीत विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख प्रा. मृदुला शुक्ला, समन्वयक सदस्य व मध्य प्रदेशमधील सेंट अलॉयजिस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जी.वझान आरसू यांचा समावेश होता.
लांजा महाविद्यालय हे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण विभागातील महाविद्यालय असून केवळ २७ वर्षांच्या कालावधीत नॅककडून चारवेळा मूल्यांकन करून घेतले आहे. पहिले मूल्यांकन स्थापनेपासून केवळ सातव्या वर्षी करून घेतले होते. त्यावेळी ‘ ब ‘ श्रेणी मिळविली होती. त्यांनतर हा आलेख प्रत्येकवेळी उंचावत नेत चौथ्या मानांकनात ३.१७ गुणांना गवसणी घालून ‘ए ‘ श्रेणी प्राप्त केली. विशेषत: कोविड काळानंतर मूल्यांकन करून घेताना महाविद्यालयासमोर अनेक आव्हाने होती. परंतु न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये व सर्व पदाधिकारी, संचालक यांचे पाठबळ, प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांचे नेतृत्व, समन्वयक डॉ. काशिनाथ चव्हाण आणि सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांची कामगिरी, माजी विद्यार्थी असोसिएशनची मोलाची साथ, आजी विद्यार्थी आणि पालक यांचे योगदान या साऱ्यांमुळे ही अत्युच्च कामगिरी करण्यात महाविद्यालयाला यश लाभले आहे.
सन २०१७ ते २०२३ या कालावधीत महाविद्यालयाने सर्व क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) कडून दोन कोटी रुपयांचे अनुदान महाविद्यालयाला प्राप्त झाले. या अनुदानातून महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासह शैक्षणिक सुविधा देण्यासाठी स्मार्ट क्लासरूम, संगणक, क्रीडा साहित्य, ग्रंथ, सायन्स विभागासाठी अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्यात आली. तसेच न्यू एज्युकेशन सोसायटीने इमारत बांधकाम आणि अनेकविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. माजी विद्यार्थी असोसिएशनने महाविद्यालयाला अनेक उपक्रमांतून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे महाविद्यालयाला विद्यार्थ्यांना अनेक सुविधा प्राप्त करुन देता आल्या आहेत.
लांजा महाविद्यालयाने नॅकची ‘ए ‘श्रेणी प्राप्त केल्याबद्दल सर्व स्तरातून न्यू एज्युकेशन सोसायटी व लांजा महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये अनेकांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे, त्याबद्दल सर्वांचे न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे अध्यक्ष जयवंत शेट्ये व सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ.अरविंद कुळकर्णी, उपप्राचार्य व नॅक समन्वयक डॉ. के. आर. चव्हाण, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी आभार मानले आहेत.











