लांजा( प्रतिनिधी) गावठी दारू धंद्याविरोधात पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली असून सोमवारी ११ सप्टेंबर रोजी साटवली भंडारवाडी येथे करण्यात आलेल्या कारवाईत गावठी आणि गोवा बनावटीचा मद्यसाठा असा एकूण २३४९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री १०.३० वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत पोलिसांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार लांजा पोलिसांनी सोमवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्याने साटवली भंडारवाडी येथील लियाकत काझी यांच्या बंद घराचे मागील बाजूस झाडी झुडपामध्ये या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी नितीन शांताराम तरळ (व ३४ वर्षे राहणार गांगोवाडी साटवली) व अनोळखी इसम असे आढळून आले. यावेळी नितीन तरळ याच्या ताब्यात पन्नास रुपये किमतीची एक लिटर ची तीन छोट्या पारदर्शक पिशवीमध्ये बांधलेली गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. त्याचप्रमाणे या ठिकाणी बेवारस स्थितीत ५२६ रुपये किमतीचे हनी ब्लेड ब्रांडीचे प्लास्टिक बॉटल वीज बाटल्या, २८९ रुपये किमतीचे लेमन व्होडखा ११ बाटल्या, ३६८ रुपये किमतीचे हायवर्ड फाईन व्हिस्की चे १४ बाटल्या, ४८० रुपये किमतीच्या रोमानिया व्होडका १८० मिली मापाच्या तीन बाटल्या, २२५ रुपये किमतीच्या मॅकडॉल नंबर एक अशा तीन बाटल्या, २२० रुपये किमतीचे डॉक्टर ब्रँडी दोन बाटल्या, २४० रुपये किमतीच्या रॉयल चॅलेंज विस्की दोन बाटल्या असा एकूण २३४९ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या नितीन तरळ व अन्य एकावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस मोरे हे करत आहेत.
साटवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावठी व विदेशी दारूबंदीचा निर्कणय रण्यात आला होता. आणि त्यानंतरही गावात अशा प्रकारे दारू विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांनी पुन्हा एकदा या दारूबंदी विरोधात कारवाई केली आहे. या कारवाईचे साटवली ग्रामस्थांतून स्वागत केले जात आहे.











