राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील फुपेरे गावचे सुपुत्र व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, फुपेरे नवविकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र उर्फ नाना शांताराम सावंत (९३) यांचे बूधवार ६ सप्टेंबर रोजी मुंबई ठाणे येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे सल्लागार विलास सावंत यांचे ते वडिल होत.
ते पोलीस खात्यातून निवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर गावच्या ओढीने ते गावात स्थायिक झाले होते. अलिकडेच त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे उपचारार्थ मुलगा श्री.विलास यानी त्यांना मुंबईला आणले होते. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. मात्र बुधवार ६ सप्टेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावली त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
गावात प्राथमिक केंद्र सुरू व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कालांतराने हे केंद्र सुरू झाले. गावच्या सर्वांगिण विकासासाठी ते सतत प्रयत्नशिल असत. नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक असलेल्या नानांचे कायमच आपल्या गावाकडे लक्ष राहिले. गावात रस्ते, विज, पाणी, एसटी अशा मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या रूपाने गावातील जुन्या पिढीतील हाडाचा सामाजिक कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
—————————————————-












