दारुसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोघे ताब्यात

इन्सुली एक्साइज चेकपोस्ट येथे कारवाई 

बांदा : प्रतिनिधी
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने कारवाई करत आंध्रप्रदेशातील दोघांना अटक केली. या कारवाईत त्यांच्याकडून ३ लाख रुपये किमतीची दारू व १० लाख रुपये किमतीची गाडी गाडी असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कालापला राजेश (वय ४०) व अप्पानी रसी किरण (वय २६, दोघेही रा. आंध्रप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई शुक्रवारी सकाळी इन्सुली तपासणी नाका येथे करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोव्याहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची इन्सुली तपासणी नाका येथे नेहमीप्रमाणे तपासणी होत होती. दरम्यान गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारे (एपी२१ एई ०१११) एक्स्ट्रीम चारचाकी गाडी आली असता येथील कर्मचारी यांनी गाडीला तपासणीसाठी थांबण्याचा इशारा केला. गाडीची तपासणी केली असता पाठीमागील हौद्यात मोठया प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा बेकायदा साठा असल्याचे समोर आले. यामध्ये विदेशी मद्याच्या क्वालिटी लिकर्स असे नमूद असलेल्या चक्क सहाशे दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पथकाने ३ लाख रुपये किमतीची दारू व १० लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई इन्सुली तपासणी नाका निरीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरिक्षक तानाजी पाटील, प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरिक्षक गोपाळ राणे, प्रसाद माळी, रणजित शिंदे यांच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत.