साडवली भुवडवाडीतील सौरभ शिगवण या तरूणाचा अपघाती मृत्यू

देवरूख : मुंबईतील अंधेरी येथून दुचाकीने आपल्या घरी गणेशाेत्सवासाठी यायला निघालेल्या संगमेश्वर तालुक्यातील साडवली भुवडवाडीतील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावरील खेरशेत (ता. चिपळूण) येथे घडला. सौरभ सुरेश शिगवण (२३) असे मृत तरूणाचे नाव आहे. सौरभ हा गेली दोन वर्ष मुंबई येथे कामाला होता. त्याच्या अपघाती मृत्यूने साडवली भुवडवाडीवर शोककळा पसरली आहे.

सौरभ शिगवण हा मुंबई येथून गणेशोत्सवासाठी आपल्या साडवली येथील घरी येण्यासाठी दुचाकीने निघाला होता. त्याच्यासाेबत त्याचा मित्र देवेंद्र रावणंग (२१, रा. कर्ली. ता. संंगमेश्वर) हा हाेता. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असतानाच संगमेश्वर तालुक्याची हद्द येण्यापूर्वीच खेरशेत येथे दुचाकी घसरून अपघात झाला. यामध्ये सौरभ शिगवण याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासाेबत असलेला मित्र देवेंद्र जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सौरभ हा शांत, प्रेमळ व अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता.

घरची परिस्थिती बेताची असल्याने तो कामानिमित्त मुंबई येथे गेला होता. ताे आपल्या कुटुंबाचा आधार बनला होता. गणेशोत्सवाच्या तोंडावरच झालेल्या या अपघातामुळे शिगवण कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेने साडवली भुवडवाडीवर शोककळा पसरली आहे. रविवारी सायंकाळी उशिरा सौरभच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई- वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, हरहुन्नरी स्वभावाच्या सौरभच्या अपघाती मृत्यूने शिगवण कुटुंबाचा आधारवड हरपला आहे. तर त्याची अचानक एक्झीट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे