साळशी येथील इनामदार श्री देवी पावणाई मंदिरात रविवार १५ ऑक्टोबरपासून ऐतिहासिक शाही थाटात नवरात्रोत्सव सोहळा!

शिरगाव (वार्ताहर)ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौ-याऐंशी खेड्यांचा अधिपती असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देवी पावणाई देवालयात आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी रविवार १५ ऑक्टोबरला घटस्थापना करुन पारंपरिक रितीरिवाजप्रमाणे ऐतिहासिक शाही थाटात नवरात्रोत्सव व विजयादशमी (दसरा) सोहळा साजरा करण्यात येतो.

आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी इनामदार श्री देवी पावणाई देवालयात घटस्थापना करण्यात येते.इनामदार श्री देवी पावणाई देवालयात उत्सव काळात दररोज सकाळी ८ ते ९ सप्तशती पाठाचे वाचन, सकाळी ९ ते १२ देवीचे दर्शन व ओटी भरणे,दुपारी १२ ते १ देवीची आरती व नैवेध, दुपारी १ ते ४.३० देवीचे दर्शन व ओटी भरणे, सायंकाळी ४.३० नंतर घडशी व गोंधळी यांचे देवीच्या सभामंडपात सुश्राव्य गायन व वादन होते. सायं. ७ ते ७.३० नौबत, रात्री ९ वाजता प्रवचन (पुराण), रात्री १० वाजता देवीची सुरेल आरती, रात्री १०.३० वाजता पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम,यानंतर श्री देवीच्या सभामंडपात घडशी व गोंधळी यांचे सुश्राव्य गायन व वादन होते. रात्री १२ वाजता किर्तनाचा कार्यक्रम होतो. किर्तन झाल्यानंतर आरती होवुन एक दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते.या कार्यक्रमाची सांगता होई पर्यंत गणवेशातील पाहरेकरी देवासमोर खडा पहारा देतात याप्रमाणे दररोज आठ दिवस नित्यनेमाने कार्यक्रम होतात. व नवव्या दिवशी सकाळी नवचंडी पाठाचे वाचन व त्यानंतर नवचंडी होमाचे आयोजन करण्यात येते. नवचंडी होम झाल्यानंतर सामुदायिक प्रार्थना केली जाते राञी श्री देवीची पालखी प्रदक्षिणेनंतर इनामदार श्री देवी पावणाई देवालयाच्या सभामंडपात नाट्यप्रयोग सादर करण्यात येतो पहाटे लळीत कार्यक्रम होवून काकड आरतीने कार्यक्रमाची सांगता होते.

दुस-या दिवशी विजयादशमी ( दसरा) ऐतिहासिक शाही थाटात साजरा करण्यात येतो. या उत्सवा निमित्ताने इनामदार श्री देवी पावणाई देवालयात व श्री देव सिध्देश्वर देवालयात आकर्षक विद्युत रोषणाई करुन मंदिर सजविले जाते. इनामदार श्री देवी पावणाई व इतर देवदेवतांना वस्ञालंकारांनी तसेेच देव तरंगांनाही सजविले जाते. या उत्सव काळात श्री देवीचे दर्शन घेण्यासाठी व ओटी भरण्यासाठी दुरवरुन भक्तगण व तसेच माहेरवाशीणी येतात. चाकरमान्यांची उपस्थितीही मोठी असते. ऐतिहासिक शाही थाटातील नवरात्रोत्सव व विजयादशमी( दसरा) साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा आजही येथे जपली जाते.