निवड प्रक्रियेला स्थगिती देऊन उच्चस्तरीय चौकशी करून कार्यवाही करावी राष्ट्रवादी काँग्रेस
संतोष कोत्रे l लांजा -: लांजा तालुक्यात झालेली कोतवाल भरती ही संशयास्पद असून या भरतीमध्ये तलाठ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या मुलांना अव्वल मार्क परिषद मिळाले आहेत. त्यामुळे झालेली ही परीक्षा संशयास्पद असून या निवड प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन आज गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी लांजा तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजीत राजेशिर्के यांनी म्हटले आहे की, नुकतीच लांजा तालुक्यामध्ये कोतवाल भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये तालुक्यातील अनेक मुले मुलींनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल पाहता ज्यांना जास्त मार्क मिळाले आहेत ते सर्व महसूल विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असल्याचे निदर्शनास झाले आहे. तसेच काहीजण एकाच कुटुंबातील असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष बाब म्हणजे जी मुले तलाठ्यांच्या हाताखाली काम करत आहेत, अशी मुले तालुक्यात अव्वल आलेली आहेत. आणि हीच मुले तालुक्यात अव्वल कशी आली याबद्दल शंका उत्पन्न होत आहे .
त्याचबरोबर या कोतवाल पदभरतीमध्ये
गावातील स्थानिक मुलांवर अन्याय करून इतर गावातील मुले जी महसूल विभागात आता तात्पुरती स्वरूपात काम करत आहेत त्यांनाच भरती करण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप देखील या पत्रात अभिजीत राजेशिर्के यांनी केला आहे.
आणि म्हणूनच एकूणच सदर परीक्षा आणि त्याचे लागलेले निकाल पाहता यामध्ये साशांकता असून सदर परीक्षा ही निपक्षपातीपणे घेण्यात आलेली नाही असे यावरून जवळपास स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदर निवड प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि त्यानंतरच योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे अभिजीत राजेशिर्के यांनी केली आहे.











