दोन पर्ससीन ट्रॉलरवर हल्ला

अन्य छोट्या नौकेतून आलेल्या व्यक्तींनी केला हल्ला : तळाशील समोरील समुद्रातील घटना : अनेक खलाशी जखमी : लाखो रुपयांचे नुकसान : मालवण पोलीस ठाण्यात तक्रार

मालवण | प्रतिनिधी : मालवण तळाशील समोरील समुद्रात दोन पर्ससीन नेट ट्रॉलरला त्या ठिकाणी आलेल्या अन्य नौकामधील व्यक्तींनी घेरून दोन्ही पर्ससीन नेट ट्रॉलरवर हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली. हल्ला दरम्यान दोन्ही पर्ससीन नेट ट्रॉलरवरील खलाशांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच बोटीवरील मच्छिमारी साहित्याचे तसेच जाळ्यांचे असे सुमारे १५ लाखा पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान या हल्ल्यात दोन्ही पर्ससीन नेट ट्रॉलरवरील अनेक खलाशी जखमी झाले आहेत. तीन खलाशांना रात्री मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. यातील एका खलाशी याच्या चेहऱ्यावर चाकूने जखम झाल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच मालवण पोलिसांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी तळाशील समोरील समुद्रात सर्जेकोट येथील कृष्णनाथ तांडेल यांची चिन्मय प्रसाद व प्रथमेश सीताराम लाड यांची पीरसुलेमान या पर्ससीन नौका होत्या. यावेळी 18 पात नौकांनी या पर्ससीन ट्रॉलरना घेरून हल्ला चढवीला. दांडे, काठ्या व बोटीवरील साहित्य यांनी खलाशाना मारहाण करण्यात आली. यामध्ये अनेक खलाशी जखमी झाले. तसेच प्रथमेश लाड यांच्या पर्ससीन नेट ट्रॉलवरील हल्ल्यातही काही खलाशी जखमी झाले. तांडेल यांच्या तीन खलाशाना रात्री मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

याबाबतची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी रुग्णालयात हजर होत माहिती घेतली. त्यानंतर मालवण पोलीस स्थानकात याबाबत जबाब नोंद करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

पर्ससीन ट्रॉलर वरील फिश फाईन्डर, मासेमारी जाळी व इंजिन यांचीही नासधूस करण्यात आली. जाळे फॅन मध्ये अडकवून मागे पुढे बोट केल्याने जाळी तुटून मोठे नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, बोटीवरील साहित्य फेकून तसेच नेऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. असे कृष्णनाथ तांडेल यांनी सांगितले. दाखल तक्रारीतून अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

फोटो : पर्ससीन नेट ट्रॉलरवरील जखमी खलाशी यांना मालवण ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.