सैन्यदलाकडून पुष्पचक्र अर्पण करून दिली अखेरची मानवंदना
चिपळूण | प्रतिनिधी :- मोरवणे गावचे सुपुत्र आणि दानशूर व्यक्तीमत्व मेजर अंकुशराव राजारामराव शिंदे यांचे दिनांक २४/१०/२०२३ रोजी पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पश्या आजाराने वयाच्या ७३ व्या वर्षी दुख:द निधन झाले आणि मोरवणे गावावर शोककळा पसरली.
कै अंकुशराव यांचा जन्म १९५१ साली सापिर्ली, ता.खेड येथील त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय कुलाबा, तसेच माध्यमिक शिक्षण सेंट पॉल हायस्कूल, बेळगाव येथे झाले. त्यांचे वडील कै लेफ्टनंट राजारामराव हे भारतीय सैन्यदलात असल्यामुळे त्यांनी मोठे चिरंजीव अंकुशराव यांना मराठा सेंटर बॉईज हॉस्टेल, बेळगाव येथे १९६६ ते १९६८ या दोन वर्षासाठी सैनिकी शिक्षण घेण्यासाठी दाखल केले. आणि त्याचवेळी ते मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले.
वडिलांच्या मागे आपणही सैन्यामध्ये जाऊन देशसेवा करावी या उद्देशाने ते १९६९ साली मराठा लाईट इन्फेंटरी, बेळगाव येथे सोल्जर म्हणून भरती झाले. त्यानंतर त्यांनी १९७१ साली बांगलादेश युद्धात सुद्धा सहभाग घेतला होता. त्यांचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व होते तसेच ते एक उत्कृष्ट हॉकीपटू होते ते १९७२, १९७३ साली सैन्यादलाकडून सर्विसेसच्या राष्ट्रीय संघातून खेळले. आणि यामुळेच त्यांची १९७४ साली भारतीय सेनेमध्ये अधिकारी म्हणून निवड झाली.
या दरम्याने त्यांनी डेहराडून, पुणे याठिकाणी प्रशिक्षण पूर्ण करून ते १९७८ साली सैन्यामध्ये “लेफ्टनंट” म्हणून अधिकारी झाले आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर त्यांची बदली १५ जाट रेजिमेंट येथे झाली. साहेब १९८९ साली वीस वर्ष सेवा करून निवृत्त झाले या कालावधीत त्यांनी जम्मू-काश्मीर, पूंच, नौशेरा, लखनौ, पश्चिम बंगाल, बेळगाव, पुणे इत्यादी ठिकाणी सेवा केली निवृत्तीनंतर मेजर अंकुशराव सिडको, नवीमुंबई येथे चीफ सिक्यूरिटी ऑफिसर या पदावर रुजू झाले.
त्यावेळी त्यांनी गावातील तसेच आजूबाजूच्या भागातील अनेक तरुणांना CIDCO मध्ये नोकरीला लावले. आपली नोकरी करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून कै अंकुशराव साहेबांनी गावच्या विकासमध्येसुद्धा लक्ष दिले. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने ग्रामदेवतेच्या नूतन मंदिर उभारणीमध्ये मोठे आर्थिक सहाय्य केले.
तसेच त्यांनी स्वखर्चातून मंदिर परिसरामध्ये हॉल बांधून दिलेला आहे, तसेच श्रीराम मंदिर बांधकामासाठीसुद्धा त्यांचे मोठे योगदान दिले आहे, तीन गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे श्री दत्त विद्यालयातील विध्यार्थ्यांसाठी सायकल स्टॅन्ड, संगणक संच, तेथे असणारे वाचनालयासाठी भरघोष देणगी दिली आहे तसेच दरवर्षी गरीब आणि होतकरू विध्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तू देत असत. त्यांच्या या निस्वार्थी, निगर्वी, आणि दानशूर स्वभावामुळे गावातील प्रत्येक ग्रामस्थाला मेजर साहेबांबद्दल आदर आणि आपुलकी होती.
त्यांच्या मागे पत्नी श्रीमती आरती वहिनी, उच्चविभूषित एक विवाहित मुलगी सौ अर्चना, नातू कु.आहण तसेच जावई श्री गौरव ढेरे हे पुणे येथे मोठे उद्योजक आहेत. तसेच त्यांना श्री अशोकराव, श्री शिवाजीराव, श्री तानाजीराव हे तीन भाऊ असून त्यांचेही सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. मेजर साहेब धार्मिक वृत्तीचे होते त्यांची पाली येथील बल्लाळेश्वर गणपती,मोरवणे ग्रामदेवता, कुलस्वामिनी श्रीरामवरदायनी यांच्यावर मोठी श्रद्धा आणि प्रेम होते.












