नमन लोककला जगासमोर आणण्यासाठी ‘महानमन’ होणार निर्मिती

रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी तालुक्यात पिढ्यानपिढ्या नमन लोककला अविरतपणे जपणाऱया येथील नमन मंडळांच्या कलाकारांना सोबत घेत कोकण नमन कला मंच रत्नागिरी ‘महानमन’ निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील नमन मंडळांच्या सहकार्याने कलावंतांना मराठी रंगभूमी दिनी एकत्रित आणून नमन लोककला जगासमोर अधिक वृध्दीगंत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

कोकण नमन कला मंच रत्नागिरी तालुका शाखा या संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर (पीटी) कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी सदस्य व जंबो कार्यकारणी सदस्य आणि कलावंत यांच्यासमवेत गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात विचारविनिमय सुरू होता. त्यासंदर्भात विशेष बैठकही घेण्यात आली. या विषयावर चर्चा करून महा नमन कार्यकमासाठी सर्वांनी पाठींबा व सहकार्य दर्शवले. या कार्यक्रमाद्वारे नमन कलावंतांना ‘अ’ दर्जाची पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी संस्थेचा मानस आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे पुढील नियोजन करणे शक्य झालेले आहे.
मराठी रंगभूमी दिनी 5 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी तालुका स्तरावरील ‘महानमन’ कार्यकमाच्या तालिमेचा शुभारंभाचा कार्यक्रम हातखंबा येथे सिध्दीगिरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रभाकर (पीटी) कांबळे, संस्थापक अध्यक्ष श्रीधर खापरे, ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश होरंबे, वसंत साळवी, विश्वनाथ गावडे, संतोष धनावडे, सुरेश येजरे, चंद्रकांत पडये, श्रीकांत बोंबले आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यासाठी तालुकाभरातील विविध नमन मंडळांतील कलावंतांची मोठी उपस्थिती होती. हा कार्यक्रम मोठ्या हिरहिरीने पुढे नेत नमन लोककला अधिक वृध्दीगंत करण्याचा संकल्प सा-यांनी करून केला आहे.