रत्नागिरी नगर परिषदेने पॅनलमध्ये वकिलांची नेमणूक करताना किमान पात्रता निकष ठेवावेत 

सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांची मागणी 

रत्नागिरी : नगर परिषदेच्या न्यायालयीन खटल्यांचा बहुतांशवेळा संबंध हा सामान्य जनतेशी येत असतो. अशावेळी पालिकेचे खटले चालवणारे वकिलांच्या पॅनलमध्ये किमान पात्रता निकष असावेत, अनुभवी वकिलांची नेमणूक करावी अशी मागणी रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांनी केली आहे. तसेच या पॅनलमध्ये महिला वकिलांना सुद्धा समान स्थान द्यावे अशी मागणी केली आहे.

याबाबत श्री. परुळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी या रत्नागिरी नगर परिषदेच्या वकिलांच्या पॅनलची माहिती देऊन काही गोष्टींची मागणी प्रशासनाकडे केली होती. यासाठी परुळेकर यांनी माहितीच्या अधिकारात पालिका प्रशासनकडून माहिती मागितली होती. याबाबत बोलताना परुळेकर म्हणाले कि पॅनलमध्ये कुठलाही वकील नेमणूक होण्यास माझा आक्षेप नाही. पण नेमणूक होण्यासाठी किमान पात्रता निकष असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये किमान काही वर्ष स्वतः वकिली केल्याचा अनुभव आवश्यक असावा. नगर परिषद रत्नागिरीने या पॅनलमध्ये घेतलेला एक वकील 2020साली वकिलीची परीक्षा पास झाले आहेत आणि त्यांनी 2021 साली वकिलीची सनद घेतली व त्याच वर्षी ठराव नगर परिषदेने करून त्यांना नगर परिषद चे वकील म्हणून पॅनलवर नेमले आहे तर अन्य नियुक्त वकिलाने २०१४ मध्ये वकिलीची पदवी घेतली असून २०१५ मध्ये सनद घेतली आहे. परुळेकर यांनी याबाबतचे पालिकेचे कागदपत्र दाखवले.

जो व्यक्ती 2020 साली वकिलीची परीक्षा पास झाला, त्याने 2021साली वकिलीची सनद घेतली त्याला किमान वकिलीचा अनुभव नसताना त्याची नेमणूक नगर परिषद वकील म्हणून कशी केली. नव्या वकिलाची जूनियर्शिप करणे व स्वतः वकिली करणे यात फरक आहे असेही श्री परुळेकर म्हणाले. मात्र अनुभव नसलेल्या दोन्ही वकिलांना ठराव करून नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नगर परिषद चे वकीलपॅनलवर एकूण वकील संख्या किती व त्यात महिला वकील किती व पुरुष वकील किती याची माहिती नगर परिषदेने श्री परुळेकर यांना लेखी दिलेली आहे. त्यात नगर परिषदेने माहिती मध्ये 17 वकील पॅनलवर आहेत पैकी 2 महिला व15 पुरुष असे म्हटले आहे. यामध्ये स्त्री पुरुष समानता दिसत नाहीत. रत्नागिरीत नावाजलेल्या महिला वकील आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा पालिका प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेच्या पॅनलमध्ये 17 वकील पैकी 8 तरी महिला वकील म्हणून नेमणूक करायला हव्या. त्यासाठी आरक्षण ठेवायला हवे होते. नेमणूक आधी मुलाखत व किती वर्ष वकील म्हणून काम केले , कुठल्या प्राकराच्या केसेस चालवल्या याची माहिती घेणे आवश्यक आहे.

नगर पालिका प्रशासनाच्या न्यायालयात चालवल्या जाणारे खटले हे थेट नागरिकाच्या हिताशीही जोडलेले असतात. अशावेळी सर्वसामान्य नागरिकाच्या हिताशी संबंधित हे खटले चालवण्यासाठी अनुभवी वकील पॅनलमध्ये घेणे आवश्यक असून तशी अटीची तरतूद पालिकेने केली पाहिजे अशी मागणी अमेय परुळेकर यांनी केली आहे.