गुहागर | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील पंदेरी दाभोळ येथून घरातून बेपत्ता झालेल्या 61 वर्षीय वृध्दाचा मृतदेह 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता गुहागर तालुक्यातील मोडकाआगर धरणामध्ये सापडला. या मृतदेहाची ओळख पटवून तो त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
दाभोळ पंदेरी येथील गणपत पांडुरंग घरवे हे इसम 19 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी एक वाजल्यापासून त्यांच्या घरातून बेपत्ता झाले होते. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता दाभोळ वर्णोशी येथील बौद्धवाडीच्या दरम्यान काही लोकांना ते दिसले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. दरम्यान, गुहागर तालुक्यातील वरवेली धरणामध्ये त्याचा मृतदेह सापडून आला. याबाबतची माहिती गुहागर पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला व पंचनामा करून पुढील कारवाईसाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. या घटनेची खबर सर्व पोलीस ठाण्यात देण्यात आली. दाभोळ येथील एक इसम बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करून ही माहिती देण्यात आली. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवून तो आमचा असल्याची खात्री दिली व नातेवाईक गुहागर मध्ये दाखल झाले. दरम्यान, यापूर्वीही हा इसम घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या डोक्यावरती परिणाम झाल्याची माहिती दाभोळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली. या घटनेचा अधिक तपास गुहागर पोलीस करीत आहेत.










