भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांची खा. विनायक राऊत यांच्यावर टीका
मालवण | प्रतिनिधी : नौसेना दिन निमित्ताने पंतप्रधान मालवण दौऱ्यावर येत असताना त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किंवा कोकणच्या विकासासाठी भरीव निधीची मागणी करण्याचे सोडून याठिकाणच्या रस्त्यांच्या कामांची चौकशीसाठी तक्रार करणार असल्याचे भाष्य खासदार विनायक राऊत करत आहेत. त्यांच्याकडून अशाप्रकारच्या राजकारणापेक्षा दुसरी अपेक्षा न केलेली बरी, असा उपरोधिक टोला भाजप शहर प्रभारी तथा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी लागवला. खासदार राऊत यांनी शहारात चालू असलेल्या कामांची खुशाल चौकशी करावी त्याचबरोबर देवबाग, वायरी येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी अर्धवट केलेल्या कामांची तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मालवण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांचीही चौकशीची मागणी करण्याचे धाडस दाखवावे. सोबतच गेली दहा वर्षे खासदार कार्यकाळात कोणती कामे केलीत हेही जनतेसाठी जाहीर करावे, असे खुले आव्हान केनवडेकर यांनी दिला आहे.
मालवण येथे नौसेना दिनाचा कार्यक्रम हा न भुतो न भविष्यती असाच होणार आहे. या सोहळ्यामुळे मालवणचे पर्यटन जगाच्या नकाशावर अधिक ठळकपणे येणार आहे. भविष्यात मालवणात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. विशाखापट्टण याठिकाणी अशाचप्रकारे नौसेना दिन साजरा झाल्यानंतर त्याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत गेली. मालवण येथील कार्यक्रम योग्यप्रकारे होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून योग्यप्रकारे नियोजन केले जात आहे. होणारा विकास पाहता केवळ राजकारण करून विरोधाला विरोध करण्यासाठी खासदार राऊत यांनी मालवण दौरा आयोजित करत विकासकामाबाबत टीका टिपण्णी करण्याची नौटंकी केली. मालवणमधील कामे घेण्यासाठी ठाकरे गटातील कोणीकोणी प्रयत्न केले याचीही माहिती आमच्याकडे आहे. कामे मिळाली नसल्याने कामांवर टिका करणे योग्य नाही. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात विकासनिधी याठिकाणी आणलेला असून मालवणच्या पर्यटनाला नविन दिशा या सोहळ्यामुळे मिळणार आहे, असाही विश्वास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी व्यक्त केला.
मालवण भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केनवडेकर बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, पूजा सरकारे, आबा हडकर, महेश सारंग, राजू बिडये, विलास मुणगेकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मालवण शहरात किल्ले राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी, लाईट अॅण्ड साऊड शो, मोरयाचा धोंडा पर्यटन विकास, मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी कलादालन अशाप्रकारची विकासकामेहि रस्ते व अन्य विकास कामांसोबत होत असल्याचे केनवडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
अतिमहनिय व्यक्ती येत असताना राजशिष्टाचार म्हणून राज्य शासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या विकासकामांमध्ये राजकारण म्हणून पाहिले जात असेल तर ते चुकीचे आहे. खासदारांनी आपल्या मतदार संघात पंतप्रधान येत असल्याने त्यांचे स्वागत करण्याचे सोडून त्यांच्याकडे विकासकामांबाबत तक्रार करणार असल्याचे सांगून जनतेमध्ये दिशाभूल करण्याचे काम केले आहेत. लोकसभेत दोन वेळा खासदार म्हणून कार्यरत असताना त्याठिकाणी कोकणच्या विकासासाठी एकही मोठा प्रकल्प आणण्याचे प्रयत्न न करता होणाऱ्या कामांमध्ये अडचणी आणण्याचे काम खासदार करत आहेत. मालवणातील अनेक कामे सीआरझेडमध्ये रखडलेली असताना त्यावर राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून सदरची कामे मार्गी लावण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करणे आवश्यक होते. जर विकासकामांबद्दल काही तक्रारी होत्या तर खासदार या नात्याने संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्याठिकाणी चौकशी का केली नाही? फक्त आरोप करून माघारी जाणे का पसंत केले?असाही सवाल केनवडेकर यांनी उपस्थित केला आहे.
दहा वर्षे काय केलात?
मोरयाचा धोंडा या ऐतिहासीक ठिकाणाचा पर्यटन विकास हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून होत आहे. किल्ले प्रेरणोत्सव समिती यासाठी प्रयत्नाशील राहिली. मोरयाचा धोंडा येथील जमिन शासनाच्या नावावर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले होते. आणि आता याठिकाणी सर्व कामे होत असल्याने आपण प्रयत्न केल्याचे खासदार सांगत आहेत. मग गेली दहा वर्षे खासदारांनी मोरयाचा धोंडा या क्षेत्राचा विकास का केला नाही? २५ नोव्हेंबरला शासकीय पूजा होण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत? आजपर्यंत एकदाही २५ नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थिती का दर्शविली नाही? असेही केनवडेकर यांनी सांगून जनतेच्या हितासाठी खासदारांनी काम करणे अपेक्षित आहे, असा टोला मारला.









