कृषि विद्यापीठ, कृषि विभाग आणि कृषि कन्या यांचा संयुक्त उपक्रम
दापोली l प्रतिनिधी :-डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग आणि कृषि महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमातील करजगावस्थित वृक्षवल्ली आणि दक्षा गटाच्या कृषि कन्या यांच्यामार्फत दापोली तालुक्यातील करजगांव येथे दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी जागतिक मृदा दिनाचे निमित्ताने मंडळस्तरीय शेतकरी मेळावा व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. लोटे येथील घरडा फाउंडेशन आणि घरडा केमिकल्स लि. हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते.
कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या संकल्पनेतून कोकणातील प्रत्येक कृषि मंडळानुसार पीक निहाय शेतकरी मेळावा आयोजित करण्याचे नियोजन होते त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील या दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात शेतकऱ्यांचे मनोगत, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे याचा समावेश होता. सुरुवातीला महिला शेतकरी प्रतिनिधी श्रीमती वर्षा बेडेकर आणि शेतकरी प्रतिनिधी श्री मिलिंद बेडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच व्ही. के. जोशी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. सुनील गौड यांनीही आपले मनोगत सादर केले. कृषि विभागाचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री. दिशांत कोळप, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत आणि सन्माननीय कुलगुरू डॉ. संजय भावे आणि करजगावचे उपसरपंच श्री. प्रशांत जोशी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. सचिन पाठक, डॉ. राजेश राठोड आणि डॉ. समीर काळे यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तालुका कृषि अधिकारी प्रतिक्षा मोटे यांनी शासनाच्या विविध कृषि विषयक योजनांची माहिती दिली. विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संतोष वरवडेकर यांनी सूत्रसंचालन केले.या मेळाव्याला करजगांव आणि पंचक्रोशीतील महिला आणि पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यासोबत आयोजित कृषि प्रदर्शनात विद्यापीठाने विविध पिकांच्या विकसीत केलेल्या जाती, विविध यंत्रे व अवजारे, बांबूपासून तयार करण्यात आलेली विविध हस्तशिल्पे, सेंद्रीय उत्पादने, जैविक खते व बुरशीनाशके तसेच शिफारशींच्या तंत्रज्ञानाची माहिती सादर करण्यात आली. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी डॉ. प्रवीण झगडे, श्री नरेश आईनकर, श्री समीर उसरे, श्री चंद्रकांत साळवी यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमाला बुरोंडी करजगांव पंचक्रोशी संस्थेचे अध्यक्ष श्री जयवंत जोशी, करजगांव गाव अध्यक्ष एकनाथ रेवाळे, लाडघरच्या सरपंच्या सौ मानसी बोवणे, तालुका कृषि अधिकारी प्रतिक्षा मोटे हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संतोष वरवडेकर, विस्तार शिक्षण विभागाचे अधिकारी डॉ. आशिष शिगवण, डॉ. प्रवीण झगडे, सौ शिल्पा नाईक तसेच कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी प्रतिक्षा मोटे , मंडळ कृषि अधिकारी जयकुमार मेटे, कृषि पर्यवेक्षक दिलीप जाधव, वैदेही गुहागरकर, कृषी सहाय्यक दर्शना वरवडेकर, शुभांगी भावे, संजय जाधव आणि सूर्यकांत काष्टे यांनी परिश्रम घेतले.
कृषि विद्यापीठ, कृषि विभाग आणि कृषि कन्या यांच्या या संयुक्त उपक्रमाचे सर्वच शेतकऱ्यांनी खूप कौतुक केले आणि अशाच सहकार्यांची आणि मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली.












