चिपळूण येथे पारमार्थिक दिनदर्शिकेचे प्रकाशन

चिपळूण (वार्ताहर) : भागवत एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर माऊली कृपा सामाजिक व सांस्कृतिक संस्था शेल्डी (रजि.) यांच्या पारमार्थिक दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन ज्ञानेश्वर माऊली मंदिर आकले गुरववाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्सवात ह.भ.प. शैलेश महाराज आंब्रे यांच्या कीर्तन सेवेआधी करण्यात आले. या पारमार्थिक दिनदर्शिकेचे वैशिष्टय म्हणजे यात प्रत्येक पानावर संताचे विचार, ज्ञानेश्वरीची ओवी, मानवतेचा संदेश, आईवडिलांची पुण्याई, भगवत गीतेची थोरवी, देव, संत, गुरू, भक्ती, ज्ञान अशा परिपूर्ण बाबींचा समावेश आहे.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष हभप शैलेश महाराज आंब्रे त्यांचे वडील हभप दिपक रावजी आंब्रे तसेच आकले गावातील सुरेश कदम, सुर्वे महाराज, प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ३० वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे ज्ञानेश्वर नाझरे, अनारी गावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व सीताराम कदम तसेच गावातील व परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गेल्यावर्षी इस्रो व यावर्षी नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेली कुमारी इच्छा सीताराम कदम हिने उपस्थितांना आपल्या भाषणातून या पारमार्थिक दिनदर्शिकेचे महत्त्व अतिशय गोड वाणीने समजावून सांगितले. प्रकाशन सोहळ्याचे उत्तम नियोजन निलेश दादा जाधव व त्यांचे आकले गावातील सर्व सहकारी तसेच महिला मंडळ यांनी केले. संस्थेच्या पारमार्थिक दिनदर्शिका २०२४ च्या माध्यमातून केलेल्या स्तुत्य उपक्रमास सर्व उपस्थितांनी शुभेच्या देऊन संस्था अध्यक्ष हभप शैलेश महाराज आंब्रे यांचे कौतुक केले आहे.