राजापूर (प्रतिनिधी): काही दिवसांपुर्वी धोपेश्वर बारसू मार्गावर बिबटयाने दुचाकी स्वारावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता याच भागात भालावली मिरवणेवाडी येथे अनिल तुकाराम सिनकर यांच्या गोठयात शिरून बिबटयाने एका वासराचा बळी घेतला आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
राजापूर तालुक्यात अनेक भागात बिबटयाचा मुक्त संचार सुरू असल्याने दहशतीचे वातावरण आहे. भर दिवसा देखिल बिबटयाचे दर्शन होत असल्याने शेतावर बागेत कामाला जाणाऱ्या कामगारांमध्ये भितीचे वातावरण आहे.
भालावली गावात देखील काही दिवसांपासून बिबटयाचा वावर सुरू होता. रविवारी मध्यरात्री अचानक भालावली येथील शेतकरी अनिल सिनकर यांच्या गोठयात बांधलेल्या गुरांवर बिबटयाने हल्ला केला. यात एका वासराचा बळी बिबटयाने घेतला आहे.
या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिली असून राजापूर वनपाल सदानंद घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विक्रांत कुंभार, मदतनीस नितेश गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली व तात्काळ पंचनामा केला. शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविला जाणार असून बिबटयाच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना हाती घेण्यात येईल अशी माहिती वनविभागाने दिली आहे.









