पोलीस अलर्ट मोडवर; सावकारांचे धाबे दणाणले
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यात अधिकृत व अनधिकृत सावकारांकडून व्याजी पैसे घेतलेल्यांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने यापूर्वी दोघा सावकारी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असतानाच सोमवारी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोसरेतील फिरोज म्हैसकर याच्यावर रात्री उशिरापर्यंत चिपळूण पोलीस ठाण्यात कारवाई सुरु होती. सावकारांबाबत आता पोलीस अॅक्शन मोडवर असून आणखी काहीजणांवर गुन्हे दाखल होणार असल्याचे समजते.
गरजू नागरिक आपल्या गरजेनुसार एखाद्याकडून पैसे घेतात. पैसे परत करण्यास विलंब झाला, तर पठाणी पद्धतीने व्याज वसूल केले जाते. यासाठी अनेकदा संबंधित कर्जदाराला धमकावले जाते, वेठीस धरले जाते. काहींना ब्लॅकमेलही केले जाते. अशा अनेक तक्रारी चिपळूण पोलीस ठाण्यात आल्याने पोलिसांनी गांभिर्याने घेतले असून यापूर्वी एका महिलेला त्रास दिल्याप्रकरणी अलोरेतील एका महिलेसह खेर्डीतील खेरटकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काल पोसरे परिसरातील येथील एका सावकारी करणारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. आपणाकडे नागरिकांनी निःसंकोच संपर्क साधावा, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल व संबंधित सावकारावर चौकशी करून कारवाई करण्यात येईल, यासाठी नागरिकांनी आता पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी केले आहे. तसेच आपण सावकारांवरील ही मोहीम कायम सुरुच ठेवण्याचीस सूचना केली आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी सावकारांवर कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी सांगितले.
चौकट-
भोम, पोसरे परिसरात पोलिसांचे कौतुक
पोसरे, भोम परिसरात गेल्या काही दिवसात अवैधपणे फिरोज म्हैसकर सावकारी करीत होता. त्यांच्या सावकारीला अनेकजण कंटाळले होते. अखेर पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश केला आहे. पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नदीप साळोखे, निबंधक कार्यालयातील सौ. माने यांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईचे भोम, पोसरे परिसरातील कौतुक होत आहे. दरम्यान, गेल्या सात वर्षांत संशयित म्हैसकर यांने या बेकायदेशीर व्यवसायातून मोठी मालमत्ता जमा केली आहे, त्याची सखोल चौकशी व्हावी व गोरगरिबांचा पैसा परत मिळावा, अशी मागणीही पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.










