भाजप जिल्हा सरचिटणीस परिमल भोसले यांचा इशारा
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तहसील ऑफिस ते कापसाळ व अन्य ठिकाणच्या महामार्गावरील नविन बसवलेले स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहेत. गेले अनेक दिवस महामार्गावरती स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या आहेत मात्र ते सुरूच न केल्याने महामार्गावर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत. ठेकेदार कंपनीने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन महामार्ग प्रकाशमान करावा. येत्या आठ दिवसांत हे पथदीप सुरू न केल्यास आमच्याशी गाठ असेल, असा इशारा भाजप जिल्हा सरचिटणीस परिमल भोसले यांनी दिला आहे.
या अंधारमय परिस्थितीमुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारक यांना रात्रीच्यावेळी वाहनांचा अंदाज येत नाही आणि अनेक छोट्या मोठ्या घटना, अपघात वारंवार घडत आहेत. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक हायवेचे अधिकारी, ठेकेदार कंपनी यांना नसून या सर्व घटनेचे गांभीर्य ठेकेदार कंपनीला कधी कळणार? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी बहादुरशेख नाक्यावरील ब्रिज कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, एवढ्या मोठ्या स्वरूपात घटना घडुन देखील हायवेचे ठेकेदार जागे होत नसतील तर आमच्या पद्धतीने जागे करावे लागेल. अजूनही महामार्गाच्या कामात अनेक ठिकाणी सुधारणा आवश्यक आहेत. या सर्वांचा विचार करून हायवे ठेकेदाराने आपल्या कामात सुधारणा करावी. येत्या आठवडाभरात ठेकेदार कंपनीने हे पथदीप सुरु न केल्यास आमच्याशी गाठ असेल, असा इशारा परिमल भोसले यांनी दिला आहे.












