‘वर्क फ्रॉम होम’ करून जास्त पैसे मिळवण्याच्या नादात स्वतःचेच 3 लाख 71 हजार गमावले

रत्नागिरी | प्रतिनिधी : वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून फिर्यादीची तब्बल 3 लाख 71 हजार 339 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 12 जून ते 22 जून 2023 या कालावधीत शहरातील नाचणे परिसरात घडली आहे.

याबाबत योगेश शशिकांत रहाटे यांनी 6 महिन्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 12 ते 22 जुन 2023 या कालावधीत अज्ञाताने त्यांच्याशी इंस्टाग्राम आणि व्हॉटसअ‍ॅपवर संपर्क साधून वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून जास्त पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत त्या अज्ञातावर फिर्यादीने विश्वास ठेवून त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या येस बँकेच्या खात्यात वेळोवेळी असे 3 लाख 71 हजार 339 रुपये भरण्यास भाग पाडले. अशाप्रकारे पैसे भरुनही वर्क फ्रॉम होमचा जॉब न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी योगेश रहाटे यांच्या लक्षात आले.

त्यांनी वेळोवेळी त्या अज्ञाताशी संपर्क साधून जॉब बाबत तसेच आपल्या रकमेविषयाी विचारणा केली असता त्याने उडवीउडवीची उत्तरे दिली. तसेच काही काळानंतर त्याच्या संपर्कच होउ न शकल्याने अखेर फिर्यादीने 6 महिन्यानंतर शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.