भाजपच्या माध्यमातून दांडी बंधाऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी

 

जनतेच्या मागणीनुसार रस्ताकम बंधरा मंजूर

पहिल्या टप्यातील केवळ दगडी बंधाऱ्याचा नारळ वैभव नाईक यांनी श्रेय लाटण्यासाठी फोडला 

मात्र तो बंधारा ठरणार अडचणींचा

भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांचा आरोप

मालवण | प्रतिनिधी : श्रेय लाटण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी दांडी येथील बंधाऱ्याच्या पहिल्या टप्याच्या कामाचा नारळ फोडला. मात्र सुरु करण्यात आलेले संपूर्ण काम स्थानिक मच्छीमारांना त्रासदायक व अडचणीचे ठरणार आहे. हा बंधारा नुसताच दगडांचा असल्याने मच्छीमारांना बोटी नेआण करताना समस्या निर्माण होणार आहेत. तसेच वाहनांनाही या बंधाऱ्यावरून जाता येणार नसल्याने पर्यटन व्यवसायिकानाही याचा फायदा होणार नाही. आमदारांनी सर्व स्थानिक तसेच मच्छीमारांना विश्वासात घेतले असते तर ते स्थानिकांच्या फायद्याचे ठरले असते, मात्र आपणच काम मंजूर केले असे श्रेय लाटण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात चुकीच्या पद्धतीने काम सुरु असल्याची टीका भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केली आहे.

दरम्यान, याच बंधाऱ्याच्या दुसऱ्या टप्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणी पाठपुराव्यातुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सहकार्याने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सुमारे २०० मीटरचा उर्वरित बंधारा मंजुर करताना तो स्थानिक मच्छीमारांची मते विचारात घेऊन रस्ताकम बंधारा तसेच मच्छिमार नौका ने आण करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प उभारून निश्चीत केला आहे. यासाठी माजी खासदार निलेश राणे यांची आग्रही भूमिका महत्वाची ठरली आहे. असे केनवडेकर म्हणाले.

मालवण भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केनवडेकर बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक पंकज सादये, महिला शहर अध्यक्ष चारुशीला आचरेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, दांडी बूथ अध्यक्ष नारायण धुरी, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, कमलाकर कोचरेकर, संदीप मालंडकर, दादा कोचरेकर, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.

भाजप नेते निलेश राणे हे मालवण कुडाळ मतदार संघातील विकासकामांसाठी शासन स्तरावर सतत आग्रही आहेत. जिल्हा नियोजन विभागातून उपलब्ध होणाऱ्या निधीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून गावागावातून परिपूर्ण प्रस्ताव येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळे आता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून त्याची कामे गावागावात सुरू आहेत. यापैकी अनेक कामांचे नारळ आमदार वैभव नाईक यांना श्रेय घेण्यासाठी फोडावे वाटत असतील तर त्यांनी खुशाल फोडावे. आम्ही श्रेयासाठी नाही तर जनतेला अभिप्रेत असलेली विकासकामे पूर्ण करून जनतेच्या विश्वास सार्थकी लावू असेही केनवडेकर म्हणाले.

दांडी बंधाऱ्याचा नारळ फोडताना आमदारांनी स्थानिकांची मते विचारात घेतलेली नसल्याने बंधारा झाल्यानंतर त्याचा त्रास मच्छीमारांना होणार आहे. तसेच
बंधाऱ्यासाठी ३०० ते ५०० किलो वजनाचा दगड वापरणे आवश्यक असताना कमी वजनाचा दगड वापरण्यात येत आहे. भुमीपूजन झाल्यापासून 15 दिवसात फक्त सात डंपर दगड टाकण्यात आलेले आहेत. सदरचे काम कोण ठेकेदार करतो हे आमच्यासाठी महत्वाचे नाही, तर होत असलेले काम दर्जेदार होण्यासाठी भाजपा लक्ष ठेवून राहणार आहे. बंधाऱ्यासाठी निश्चीत करण्यात आलेल्या वजनाचा दगड वापरण्यात न आल्यास तसेच योग्य पद्धतीने काम न झाल्यास याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे जनहित याचिका माध्यमातून तक्रार केली जाईल, असेही केनवडेकर म्हणाले.

सध्या सुरू असलेल्या कामासाठी १ कोटी १० लाख रूपये मंजूर आहेत. यातून १५० मीटरचा बंधारा होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याच्या रस्ताकम कामासाठी १ कोटी ५० लाख रूपये मंजूर असून यातून २०० मीटरचे काम होणार आहे, बंधारा रुंदी वाढवण्यात आली आहे. असेही श्री. केनवडेकर म्हणाले.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी चिवलाबिच, राजकोट बंधारे जनतेच्या मागणीनुसार साकारले होते. आमदार वैभव नाईक यांना दांडी बंधारा मंजूर करण्यासाठी नऊ वर्षे वाट का बघत होते. त्यांच्या सत्ता काळात का कामे झाली नाहीत. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही आम्ही दुसऱ्या टप्प्याला मान्यता घेतलेली आहे. तीही आवघ्या तीन महिन्यात, या संपूर्ण बंधाऱ्यासाठी आवश्यक असणारी सीआरझेडची परवानगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून मिळालेली आहे. यापुढे दांडी निशाणकाठी पर्यत बंधारा होऊन स्थानिक मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक यांना फायदा होण्याच्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचे केनवडेकर यांनी स्पष्ट केले.