घरातल्या किंमती वस्तू नात्यातल्या महिलेसह तिघांनी लांबविल्याची तक्रार

 

 

चोरीच्या ऐवाजात विविध घरगुती वस्तूसह डबल बॅरल बंदुक, काडतुसे, बंदुक लायसन्स, किंमती साड्या, ड्रेसचा समावेश 

रत्नागिरी | प्रतिनिधी :शहरातील साळवीस्टॉप येथील सदनिकेतून तीन संशयितांनी तब्बल 2 लाख 6 हजार 900 रुपयांचा ऐवज लांबवला.ही घटना 29 जुलै 2023 ते 17 डिसेंबर 2023 या कालावधीत घडली आहे.

रुही केतन सनगर,राजेद्र बसाळे आणि विकी राजेंद्र बसाळे (रा.सासवड ता.पुरंदर,पूणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात उमाकांत शंकर सनगर (रा. लक्ष्मी अपार्टमेंट सी विंग साळवीस्टॉप, रत्नागिरी) यांनी मंगळवार 16 जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, या तिन्ही संशयितांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यांच्या सदनिकेतून सोफासेट, एल.ई.डी टिव्ही, भिंतीवरील घड्याळ, डबल बॅरल बंदुक, 12 बोअरची 20 काडतुसे, बंदुक लायसन्स, काळवीट जोडीचे प्लॅस्टिकचे शोपीस, दोन एचपी सिलेंडर, इन्व्हर्टर, मिक्सर, वॉटर प्युरीफायर, एक इंडक्शन शेगडी, लाकडी झोपाळा, वॉशिंग मशिन,व्हॅक्युम क्लिनर,लगेज बॅग,किंमती साड्या,ड्रेस असा एकूण दोन लाख सहा हजार नउशे रुपयांचा ऐवज संशयितांनी लांबवला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

त्यावरुन तीन्ही संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 380,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.