अज्ञात चोरट्याने वृद्धाचा हातातील बॅग लांबविली
कणकवली : जिल्ह्यात चोरीच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र आजकाल चोरीचे करण्याचे विविध प्रकार सुरू झले आहेत. अगोदर चोऱ्या ह्या रात्रौ वेळी व्हायच्या. मात्र आज कणकवली शहरात झोप उडवून टाकणारी घटना घडली आहे. एका वृद्धाच्या हातातील बॅग हिसकावून अज्ञात चोरट्याने पळ काढल्याची घटना आज कणकवली शहरात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. बँक ऑफ इंडिया समोरील भागात सर्विस रस्त्यावर हा प्रकार घडला. दरम्यान हा चोरटा बॅग हिसकावून भालचंद्र महाराज आश्रमाच्या दिशेने पळाला असल्याची चर्चा आहे. ज्यावेळी चोरट्याने त्या वृद्धाच्या हातातील बॅग हिसकावली त्यावेळी त्या वृद्धाने चोर – चोर अशी आरडाओरडा केल्यानंतर तेथील रिक्षा व्यावसायिक व अन्य लोक जमा झाले. मात्र तोपर्यंत चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला.
दरम्यान या घटनेची माहिती तात्काळ कणकवली पोलिसांना देण्यात आली. कणकवली पोलिसांनी पथकाच्या माध्यमातून या चोरट्याचा शोध सुरू केला असून, चोरट्याच्या शोधासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. दरम्यान ज्या वृद्धाच्या हातातील बॅग हिसकावली ते वृद्ध बँक ऑफ इंडिया मधून बाहेर पडले होते. त्यामुळे त्या बागेत रक्कम असण्याची शक्यता होती ही माहिती मिळाल्याने चोराने ही बॅग हीसकावून नेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.











