अनुदान प्राप्त होण्यासाठी न. प. चे मुख्यमंत्र्यांना साकडं
राजापूर (प्रतिनिधी): शासनातर्फे राबविण्यात आलेल्या हागणदारी मुक्त शहर अभियानांतर्गत राजापूर नगर परिषदेला बक्षिसापोटी प्राप्त झालेल्या एक कोटी अनुदानापैकी ३८ लाख ६० हजाराचे अनुदान शासनाकडून अद्याप प्राप्त झालेले नाही. हे रखडलेले अनुदान राजापूर नगर परिषदेला उपलब्ध व्हावे अशी मागणी राजापूर नगर परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
हागणदारी मुक्त शहर अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीद्वारे तपासणी होऊन राजापूर शहरला हागणदारी मुक्त झाल्याबद्दल प्रोत्साहनपर अनुदान म्हणून रक्कम रुपये एक कोटी रूपयांचे अनुदान २५ जुलै २०१९ च्या अध्यादेशाने मंजूर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता नगर विकास विभाग कार्यालीन आदेश ३१ ऑगस्ट २०१६ अन्वये रक्कम तीस लाख प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर मा, राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांजकडील दिनांक ४ नोव्हेंबर २०२० चे आदेशान्व्ये र.रु. ३१.४० लक्ष अनुदान नगर परिषदेला उपलब्ध झालेले आहे. असे एकुण ६१.४० लक्ष अनुदान उपलब्ध झाले असून उर्वरीत ३८.६० लक्ष अनुदान अद्यापही उपलब्ध झालेले नाही.
शासनाकडून मंजूर झालेल्या एक कोटी अनुदानांतर्गत नगर परिषदेने शासनाने विहीत केलेल्या शासन निर्णयानुसार कामे हाती घेतलेली होती. त्याअनुषंगाने घनकचरा अनुषंगीक कामाच्या प्रचार प्रसिध्दी, शहरातील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती, नगर परिषदेचे इमारती जवळील सामुदायिक शौचालय, शहर सौंदर्याकरण करणेचे दृष्टीने ओडी स्पॉट सुशोभिकरण करणे इत्यादी कामे हाती घेतली होती. तसेच शहरात आठवडा बाजार येथे आई- टॉयलेट (पे अण्ड युज) नवीन बांधणेचे कामही पूर्ण करणेत आले होते.
मात्र अद्यापही ३८ लाख्घ् ६० हजाराचे अनुदान प्राप्त न झाल्याने ज्यांनी काम केले त्या ठेकेदारांची बीले रखडली असून ते सदरची बीले अदा करण्यासाठी नगर परिषदेकडे तगादा लावत आहे.
शासनाकडून उर्वरीत हा ३८ लाख ६० हजाराचा निधी हा नगर परिषद ३ स्टार रेटींग झाल्यानंतर व ओडी ++ झाल्यानंतर देणेत येणार होता. परंतू सदर निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. राजापूर शहराने ३ स्टार रेटींग झाल्यानंतर व ओडी ++ रिसर्टीफिकेशन पूर्ण झालो आहे. यासोबत सदर सर्टीफिकेट सादर करणेत येत आहे. याकामी आठवडा बाजार येथे आई- टॉयलेट नवीन बांधणेचेकामी १७ लाख ७८ हजार इतके बील आदा करणे शिल्लक असून, घनकचरा प्रासेसिंग सेंटरचे संरक्षक भिंतीचेही रक्कम रुपये १५ लाख इतकी बोले आदा होणेची बाकी आहे.
राजापूर नगर परिषद ही क वर्ग नगर परिषद असल्याने सदर बीले स्वनिधीतून देता येणे शक्य नाही. करीता प्रोत्साहनपर अनुदानाचा उर्वरीत हप्ता ३८.६० लक्ष राजापूर नगर परिषदेला उपलब्ध व्हावा अशी मागणी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राने केली आहे.
गेली तीन ते चार वर्षे रखडलेले हे अनुदान प्राप्त झाल्यास नगर परिषदेला झालेल्या कामांची बीले अदा करणे शक्य होणार आहे.










