जीवीत हानी झाल्यावर प्रशासन व ठेकेदाराला जाग येणार का? माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांचा सवाल
२६ जानेवारी पुर्वी विषय मार्गी लावावा अन्यथा आंदोलन करणार
राजापूर (प्रतिनिधी): मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात राजापूर एसटी डेपोसमोर सर्कल की जंक्शन हा विषय गेली दोन वर्षे प्रलंबीत आहे. प्रशासन आणि ठेकेदाराकडून याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नाही. या ठिकाणची एकूणच वाहनांची वर्दळ आणि चारही बाजुने वेगाने येणारी वाहने पहाता कधीही गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासन व ठेकेदार यांना जीवीत हानी झाल्यावर जाग येणार काय? असा खडा सवाल उपस्थित करत याबाबत येत्या २६ जानेवारी पुर्वी प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी राजापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांनी केली आहे.
अन्यथा या विरोधात आता रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा ईशाराही खलिफे यांनी दिला आहे.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत जनतेच्या अनेक तक्रारी आहेत, मात्र याबाबत प्रशासनाकडून केवळ बैठकांचा फार्स केला जात आहे. प्रशासन व ठेकेदाराकडून कामांच्या पुर्ततेबाबत कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप खलिफे यांनी केला आहे.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात राजापूर एसटी डेपोसमोर सर्कल की जंक्शन हा विषय गेली दोन वर्षे प्रलंबीत आहे. कुणी जंक्शन व्हावे अशी मागणी केली तर काहींनी सर्कलची मागणी केली. या दोन्हीपैकी काहीच गेल्या दोन वर्षात झाले नाही. मुख्य महामार्ग, एसटीडेपो, बंगलवाडी यांकडून येणारी वहाने राजापूर शहरातुन येणारी वाहने आणि दोन्ही बाजुच्या सर्व्हीस रोडने येणारी वाहने अशी विचित्र परिस्थिती या ठिकाणी असून कधीही अपघात अपघात होण्याचा धोका आहे. अनेकांनी मागण्यांची निवेदने देऊनही काहीच कार्यवाही नाही.
या ठिकाणी बंगलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत निर्णय नाही, गटाराचे पाणी रोडवर आहे. गतीरोधक नाहीत, पथदीप सुरू नाहीत अशा एक नाही अनेक समस्या आहेत. मात्र याबाबत प्रशासन आणि ठेकेदाराकडून गांभीर्याने विचार केला जात नसल्याने वाहन चालक, पादचारी व नागरिकांची ससेहोलपट होत आहे. या ठिकाणी सुरक्षिततेबाबत योग्य खबरदारी घेतली नाही तर गंभीर अपघाताचा धोका आहे.
त्यामुळे या ठिकाणी सर्कल की जंक्शन उभारायचे याबाबतचा अंतिम निर्णय घ्यावा व तातडीने त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी अॅड. खलिफे यांनी केली आहे. २६ जानेवारी पर्यंत याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा अन्यथा आंम्ही आंदोलन करू असा ईशारा अॅड. खलिफे यांनी दिला आहे.
—————————–










