चिपळूण (संतोष सावर्डेकर): कोकणच्या उत्पन्नात वाढ व्हावी, इथल्या तरुणांना रोजगार मिळावा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ व्हावी यासाठी रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्प येणारच, विरोधकांनी विरोधाची चिवचिव बंद करावी असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं
राष्ट्रीय गो संमेलनाच्या निमित्ताने खेड येथे आले असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. ज्याने रिफायनरी होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्यांची ताकद हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनीही आता विरोध करणं बंद करावं, इथल्या प्रत्येक हाताला रोजगार हवा आहे, लोकहितासाठी, इथली बेरोजगारी दूर करण्यासाठी, या प्रकल्पाची नितांत गरज आहे. शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळतील, छोटे-मोठे प्रकल्प व्यवसाय त्याच्यात मुलं नोकरीला लागतील, या परिसराचा विकास होईल त्यामुळे विरोधाची चिवचिव करणाऱ्यांनी ती बंद करावी असा सज्जड इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. ह. भ. प. भगवान कोकरे महाराज यांच्या गोशाळे बाबतचा प्रश्न आपण स्वतः लक्ष घालून सोडवणार आहोत. गोशाळा ही शेती विषयी संबंधित आहे. त्याला एमआयडीसी व्यावसायिक निकष लागू होणार नाहीत. गो शाळेमुळे पर्यावरणाशी कोणतीही हानी होणार नाही असं असताना कायद्याचा अभ्यास न करता विरोध करणं आणि विरोधाला विरोध करणं हे केवळ चुकीचा आहे. या गोशाळेच्या जागेचा प्रश्न आम्ही लक्ष घालून सोडवणार असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही सुद्धा राणे यांनी या वेळेला दिली.
मुंबई गोवा महामार्गच्या बाबतीत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले सिंधुदुर्गातील महामार्गाचे काम वेळेत पूर्ण झाले आहे. तेथील लोकप्रतिनिधी, जनता आणि पत्रकार यांनी पुढाकार घेऊन या महामार्गाचे काम पूर्णत्वास नेलं. रत्नागिरीतील महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आपण संबंधित मुख्य अभियांत्याकडून माहिती घेऊन नेमकी कोणती अडचण आहे, कुठल्या ठेकेदाराचा प्रश्न निर्माण झाला आहे का? ही माहिती घेऊन केंद्रीय भुपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असंही ते म्हणाले. फेब्रुवारी महिन्यामध्ये रत्नागिरी सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचं 3 दिवसांचे शिबिर रत्नागिरीत होणार असून यात उद्योग, व्यवसायासंबंधी माहिती देणाऱ्या कार्यशाळा, कर्ज योजनाची माहिती देणारे शिबीरे घेतली जातील असे ते म्हणाले.












