कोकण दौऱ्यावर येणाऱ्या ठाकरेंनी कोकणात येऊन भुलथापा मारु नयेत : प्रमोद जठार

म्हणून राऊतयांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध 

कणकवली : उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री अडीज वर्षे असताना कोकणासाठी काहीही करु शकले नाहीत. प्रकल्पांना कोकणातील रोजगार या ठाकरे आणि विनायक राऊत यांनी बुडवून तरुणांचे नुकसान केले. त्यामुळे जनतेने येणाऱ्या निवडणुकीत खा. राऊत यांना समुद्रात बुडवावे.रोजगार नाहीत म्हणून इथल्या मुलांसोबत मुली लग्न करीत नाही. त्यामुळे प्रकल्पांना विरोध करणाऱ्या ठाकरेंनी कोकणात येवून भुलथापा मारु नयेत, असा टोला माजी आ. प्रमोद जठार यांनी केला. कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, बबलू सावंत उपस्थित होते.

 

प्रत्येक गोष्टीत खा. विनायक राऊत आणि त्यांचा पक्ष विरोध करतात, त्याला आम्ही काय करणार ? नवीन कुठलाही प्रकल्प आला की, शिवसेना उबाठा खा. राऊत आणि उद्धव ठाकरे हे आम्हाला विश्वासात घ्या म्हणतात, म्हणजे काय ? तर आम्हाला पैसे द्या….रोजगार नसल्याने कोकणातील ८० टक्के घरे बंद आहेत,रिफायनरी प्रकल्प व्हावा,म्हणून आमचे प्रयत्न आहेत. मात्र,अडकाठी आणणाऱ्या खा.राऊत यांना एकदा विचारले,तुम्ही प्रकल्पाचा अभ्यास केला का? त्यावर ते म्हणाले लोकांना नको तर आमचा विरोध राहील. आ. राजन साळवी, आदित्य ठाकरे सांगताहेत हा प्रकल्प हवा. उद्धव ठाकरे यांनी पत्र दिलं, मग राऊतांचे काय? यांचे भागवले नाही. म्हणून त्यांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असल्याचा गौप्यस्फोट प्रमोद जठार यांनी केला.

 

पुढे बोलताना ते म्हणाले, ८ फेब्रुवारीला रात्री १० वाजता पनवेल रेल्वे स्थानक येथून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी कार्यकर्ते आणि रामभक्त यांना दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी २५० प्रमाणे १५०० रामभक्तांना घेवून अयोध्या राम मंदिरात महाआरती करण्यात येणार आहेत. आम्ही अयोध्या श्रीराम मंदिरात गुलाल उधळीत वाजत – गाजत जाणार आहोत. त्या ट्रेनचा प्रमुख मी आणि स्थानिक नेते असणार आहेत.विधानसभा प्रमुख सावंतवाडी राजन तेली, कणकवली आ. नितेश राणे, कुडाळ निलेश राणे, रत्नागिरी बाळ माने या नेत्यांकडे जबाबदारी आहे. या गाडीला हिरवा झेंडा पालकमंत्री रविंद्र चव्हाण दाखवणार असल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.

 

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, कोल्हापूर या भागातील काजू बी २०० रुपये हमी भाव द्यावा, या बाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही यशस्वी झालो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, उदय सामंत यांना भेटलो, अन्य मंत्र्यानाही भेटलो. सामूहिक मंत्री उपस्थित असताना ही बैठक लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी विंनती केली आहे. ही बैठक पुढच्या आठवड्यात होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून काजू बी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च लक्षात घेवून सरकारने हमी भाव द्यावा, भावांतर म्हणून तरतूद करावी. केईएम, टाटा हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल रुग्ण संख्या वाढली आहे.

रुग्ण व नातेवाईकांना फुटपाथवर राहण्याची वेळ आली आहे. उपोषण जाहीर केल्यानंतर सरकारचे लक्ष वेधले. आता हा परिसर हेल्थ कॉरिडॉर जाहीर होणार आहे. मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर यांना भेटलो, त्यांनी चांगली भूमिका घेतली. आम्ही दोघे सिंधुदुर्ग पुत्र आहोत. हेल्थ कॉरिडॉर घोषणा येत्या अधिवेशनात होणार असल्याने त्याचा लाभ रुग्णांना होईल, असे श्री. जठार यांनी सांगितले.